‘ओजीटी’तून विद्यार्थी होणार
व्यावसायिकदृष्ट्या सक्षम
आदिनाथ सांगवे यांचे प्रतिपादन; प्राध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा
-----
लातूर, ता. १८ : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक अनुभव आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात व्यावसायिक क्षेत्रात सक्षमपणे उभे राहता येईल. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ (ओजीटी) उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविणारा आहे, असे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांतील ओजीटी समन्वयक, सहसमन्वयक आणि प्राध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांगवे बोलत होते.
सांगवे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल शास्त्रीय ज्ञान मिळण्याबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यावर भर दिला जात आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संबंधित क्षेत्राचा अनुभव मिळावा, या उद्देशाने विद्यापीठाने अभ्यासक्रमात ओजीटी संकल्पनेचा समावेश केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करता येईल. तसेच राष्ट्राबद्दलचा स्वाभिमान जागृत होऊन देशाच्या विकासालाही हातभार लागेल.
संस्थेचे सचिव माधवराव पाटील-टाकळीकर म्हणाले, बाराव्या शतकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी सर्वसामान्यांना विविध उद्योगांची माहिती दिली होती. आजही बसवकल्याण येथे उद्योगविश्व केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने उद्योगविश्व विकसित केले जात आहे. विद्यार्थ्यांना शास्त्रीय ज्ञानासोबत कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे.
या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक राजेश्वर पाटील, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. एस. एम. प्रयास आणि डॉ. पी. बी. गोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी तर आभार डॉ. डी. आर. भुरे यांनी मानले.
-----
LTR26B15384
लातूर : कार्यशाळेत प्राध्यापकांचा सत्कार करताना आदिनाथ सांगवे आणि माधवराव पाटील-टाकळीकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.