(फोटो ः ABD26J81821)
((((फोटो ओळ))) छत्रपती संभाजीनगर ः सलीम अली सरोवरातील जलपर्णी जेसीबीच्या माध्यमातून काढली जात आहे.
---
सलीम अली सरोवरातून काढली २२ ट्रक जलपर्णी
-----
दोन आठवडे चालणार महापालिकेच्या उद्यान विभागाचे काम
-----
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २० ः ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. दोन आठवड्यांत तब्बल २२ ट्रक जलपर्णी काढण्यात आली आहे. आणखी दोन आठवडे हे काम सुरू राहणार असल्याचे उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.
ऐतिहासिक सलीम अली सरोवराला अवकळा आली आहे. महापालिकेने सुमारे दहा वर्षांपूर्वी या ठिकाणी सुशोभीकरण करून पाथवे, पक्षी निरीक्षणासाठी मचान तसेच पर्यटकांसाठी बोटिंग सुरू केले होते. या कामावर शासन निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. महापालिकेने सुरू केलेले डिझेलवर चालणारे बोटिंग व सुशोभीकरणानंतर पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीवर पक्षीमित्रांनी आक्षेप घेतला. गर्दीमुळे या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होईल, तसेच जैवविविधतेला धोका असल्याचा आक्षेप घेत न्यायालयात धाव घेण्यात आली. तेव्हापासून सलीम अली सरोवर कुलूपबंद आहे. त्यामुळे सरोवरात सर्रास ड्रेनेजचे पाणी सोडले जात असून, तीन बाजूंनी अतिक्रमणांचा सपाटा सुरू आहे.
दिवसभर या ठिकाणी मद्यपींचा वावर सुरू असतो, अनेक जण बेकायदा मासेमारी करत असतात. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सलीम अली सरोवराची पाहणी केली होती. त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला. तसेच सरोवराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेने जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. जेसीबीच्या माध्यमातून जलपर्णी काढून हायवामध्ये भरून तिची विल्हेवाट लावली जात आहे. आत्तापर्यंत म्हणजेच दोन आठवड्यांत २२ ट्रक जलपर्णी काढण्यात आली असून, हे काम आणखी दोन आठवडे सुरू राहील, असे उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांतगिले.
---
फवारणीचा प्रयोग
सध्या बोटीच्या माध्यमातून जलपर्णी काठाकडे ढकलली जात आहे. काठाकडे आलेली जलपर्णी जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढली जात आहे. त्यात फवारणीच्या माध्यमातून जलपर्णी नष्ट करता येते का? याचादेखील प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
---
अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
सलीम अली सरोवराचे मर्यादित क्षेत्र पर्यटकांसाठी खुले करता येईल का? यासाठी महापालिका प्रशासनाचे/पदाधिकाऱ्यांचे काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाढत्या अतिक्रमणांसंदर्भात अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांची हिंमत वाढत आहे.
--
दुष्परिणाम असा
- तज्ज्ञांनी सांगितले, जलपर्णीमुळे पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो आणि सजीव घटकांचे विघटन वाढल्याने ‘बायोलॉजिकल ऑक्सिजन डीमांड’ वाढते.
- गढूळ आणि दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि पोटाचे विविध विकार पसरण्याचा धोका वाढतो.
- कुजणाऱ्या जलपर्णीमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे डास आणि इतर उपद्रवी कीटकांची प्रचंड उत्पत्ती होते, ज्यामुळे ताप, डोकेदुखी व अंगदुखीसारख्या साथीच्या आजारांना आमंत्रण मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.