शनिवारी-रविवारी मतदार नोंदणीची विशेष शिबिरे
----
२६ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकतींसाठीची मुदत; १६ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी
----
धाराशिव, ता. २२ (बातमीदार) : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. नवमतदारांसह पात्र नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार मतदारयादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर पात्र नागरिकांना नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नऊ सप्टेंबरला दिलेल्या पत्रातील सूचना या शिबिरांसाठी लागू राहतील. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर योग्य नियोजन करून शिबिरांचे प्रभावी आयोजन करावे व त्याबाबतचा नियमित अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
----
तरुणाईसह नवमतदारांनी नावाची खात्री करावी
नोंदणी प्रक्रियेत नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांना या सूचनांची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित मतदारसंघ व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. नव्याने मतदानासाठी पात्र ठरलेल्या युवक-युवतींसह सर्व पात्र नागरिकांनी मतदारयादीत नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.