बीड शहरात पाणीचोरांच्या मुजोरीला चाप; प्रशासनाकडून धडक कारवाई
तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रशासनाची सवय; जनतेलाच दिले उपदेशाचे डोस
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १८ : आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे अक्राळविक्राळ संकट उभे ठाकण्याची दाट शक्यता असतानाही, काही स्वार्थी घटकांकडून जलसाठ्यांवर राजरोसपणे डल्ला मारण्याचे प्रकार सुरूच आहेत. एरवी तहान लागल्यावर विहीर खोदण्याची जुनी सवय असलेल्या प्रशासनाला, पाणीटंचाईच्या वाढत्या झळांनंतर का होईना, अखेर जाग आली आहे. उपलब्ध जलसाठ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्काळातही स्वतःची तुंबडी भरण्यात मग्न असलेल्या मुजोर पाणीचोरांना वठणीवर आणण्यासाठी बीड जिल्हा महसूल प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांवर आणि तलावांवर काही महाभागांकडून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या पाणी उपसा राजरोसपणे सुरू होता. गावाची तहान भागवणाऱ्या पाण्यावर स्वतःच्या बापाची जहागिरी असल्यासारखा डल्ला मारणाऱ्या या प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रशासनाच्या पथकाने आता धडक मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत जलसाठ्यांतून बेकायदेशीररीत्या पाणी खेचणाऱ्या पाणीचोरांच्या मोटारी आणि पाइप्स प्रशासनाने जप्त केले आहेत. एवढेच नव्हे, तर संबंधित ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित करत प्रशासनाने या पाणीचोरांची पॉवरच गुल केली आहे. अचानक मिळालेल्या या प्रशासकीय दणक्यामुळे एरवी कोणालाही न जुमानणाऱ्या पाणीचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या कारवाईनंतर प्रशासनाने आता नागरिकांना शहाणपणाचे डोस द्यायला सुरवात केली आहे. पाणी ही कोणा एकाची मालमत्ता नसून ती संपूर्ण गावाची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव प्रशासनाने करून दिली आहे. आज जर पाण्याचा योग्य साठा केला आणि प्रत्येक थेंबाची बचत केली, तरच आगामी काळातील भीषण उन्हाळ्याची गरज भागवता येईल. जर आताच पाण्याचा असा वारेमाप अपव्यय सुरू राहिला, तर उद्या माणसांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. पाणीचोरी आधीच रोखली असती, तर प्रशासनावर आज उपदेश करण्याची वेळ आली नसती, अशी दबक्या आवाजातील चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.
-----
नागरिकचेही सहकार्य गरजेचे
- नागरिकांनी पिण्याचे पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे. पाणी मुबलक आहे या भ्रमात राहून गरज नसताना नळ सुरू ठेवण्याचा मोह टाळावा.
- घरातील किंवा सार्वजनिक नळांची होणारी गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून रोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचेल.
- वाहन धुणे, अंगण स्वच्छ करणे किंवा सडे शिंपडणे यासारख्या गैर-महत्त्वाच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याची चैन पूर्णपणे थांबवावी.
- तलाव, विहिरी, पाझर तलाव व इतर सार्वजनिक पाणीस्रोतांच्या ठिकाणी कोणताही अवैध पाणीउपसा निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ महसूल पथकाला त्याची माहिती द्यावी.
------
कारवाई इव्हेंट ठरू नये
ही कारवाई म्हणजे केवळ दोन-चार दिवसांचा तात्पुरता इव्हेंट ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यापुढेही कोणत्याही जलसाठ्यातून विनापरवाना अवैध पाणी उपसा करताना कोणी आढळल्यास, अत्यंत कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे भूजल संपत्तीवर डल्ला मारणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडाली असली तरी, ही मोहीम शेवटपर्यंत अशीच धडाक्यात सुरू राहते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
------
कोट
सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे गंभीर सावट असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे. अशा संकटकाळात उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. असे असतानाही काही जणांकडून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या पाणी उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने यावर कडक पावले उचलत मोटारी व पाईप्स जप्त करण्याची कारवाई केली आहे. यापुढे कोणत्याही जलसाठ्यातून असा अवैध पाणी उपसा सहन केला जाणार नाही, आणि नियम मोडणाऱ्यांवर आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.