मजूर शोधण्याची धावपळ थांबली!
शेतमजुरांचे गट व्हॉट्सॲपवर सक्रिय; कामाचे दरही जाहीर
मंठा, ता. १८ (बातमीदार) : मूग तोडणी, सोयाबीन काढणी, ज्वारी सोंगणी, कापूस वेचणी यांसह इतर हंगामी कामांसाठी शेतकऱ्यांना पूर्वी रात्री किंवा सकाळी लवकर शेतमजुरांच्या घरी जाऊन कामाला येण्याची विनंती करावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत असे. आता यांत्रिकीकरणानंतर डिजिटल युगात ग्रामीण भागातील महिलाही मोबाइल फोनवरील व्हॉट्सॲप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा सहज वापर करू लागल्या आहेत. याचा फायदा शेतमजुरांनीही घेतला असून, १५ ते २० महिला शेतमजुरांनी एकत्र येत गट तयार केले आहेत. हे गट ठिकठिकाणी शेतीकामांचे ठेके घेत आहेत.
मंठा तालुक्यात सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. शेतमजुरांनी स्वतःहून समाजमाध्यमांचा वापर करून कामाची जाहिरात करण्यास सुरवात केली आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर प्रसारित होणाऱ्या या अनोख्या जाहिरातींमध्ये मजुरांच्या गटाकडून कामाची उपलब्धता आणि मजुरीचे दर जाहीर केले जात असून, शेतकऱ्यांना थेट कामाची ऑफर दिली जात आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या जाहिरातीत सोयाबीन काढणीसाठी शेतमजूर उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जो शेतकरी आधी फोन करून काम निश्चित करेल, त्याला प्रथम मजुरांचा गट उपलब्ध करून दिला जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
.....
कोट
मध्यस्थांची दलाली वाचून थेट व्यवहार करणे सोपे झाले आहे. पूर्वी मजुरांच्या मुकादमांना किंवा मध्यस्थांना थोडे जास्त पैसे मोजावे लागत होते. आता समाजमाध्यमांमुळे मजूर थेट उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर माहिती मिळत आहे. सोयाबीन काढणीसाठी चार ते साडेचार हजार रुपये प्रतिएकर दर परवडणारा आहे की नाही, याचा विचार पावसाच्या भीतीनुसार करावा लागतो.
- प्रल्हादराव बोराडे, सोयाबीन उत्पादक शेतकरी
.....
कोट
हंगामात दोन-चार दिवसच चांगला रोजगार मिळतो. आम्ही आमचे दर आणि उपलब्धता समाजमाध्यमांवर टाकल्यामुळे थेट काम मिळणे सोपे झाले आहे. सध्या काही शेतमजुरांचे गट समाजमाध्यमांवर अशा प्रकारे जाहिरात करीत आहेत. हळूहळू ही पद्धत वाढेल.
- शंकर जाधव, शेतमजूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.