मुदतीत कर्जफेड करणाऱ्या महिलांना व्याजदरात सवलत
-
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २३ ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांना कर्जावरील व्याजदरात वीस टक्के सवलत देण्यात येणार आहे. थकबाकीदार महिलांनाही टप्प्याटप्प्याने कर्जफेड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची (एमएनएस बँक) सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन करीत प्रगती सुरू आहे. आधुनिक बँकिंग सुविधांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या मायक्रो फायनान्स विभागामार्फत विनातारण एक लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे अनेक बचत गटांच्या कर्जाची परतफेड थकल्याने निर्माण झालेली थकबाकी कमी करण्यासाठी बँकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांना व्याजदरात वीस टक्के सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय थकबाकीदार महिलांनाही टप्प्याटप्प्याने कर्जफेड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या मायक्रो फायनान्स विभागामार्फत कर्ज घेतलेल्या महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन सराफ, सरव्यवस्थापक किशनसिंह गहेरवार, वसुली अधिकारी विश्वनाथ सुरवसे, शाखा व्यवस्थापक प्रवीण जाधव, पंकज पाटील, सुमीत चव्हाण, सुधीर कांबळे, श्रद्धा कावळे, अनिता पाचंगे आदी उपस्थित होते.
बँकेने ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग, फोनपे, गुगल पे, आरटीजीएस या सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महिला बचत गटांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देत त्यांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या काही महिला नियमितपणे कर्जाची परतफेड करीत आहेत, तर काही महिलांची वैयक्तिक व आर्थिक अडचणींमुळे कर्जखाती थकबाकीत गेली आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि इतर महिलांनाही कर्जफेड करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने बँकेने सवलतींबाबत हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.