प्रसूतिगृहांवर खासगीकरणाची टांगती तलवार!
महापालिकेची ई-निविदा; ३० वर्षांपर्यंतचा करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सहा प्रमुख प्रसूतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थांकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षातर्फे यासंदर्भात ई-निविदा मागविण्यात आल्या असून, सुरुवातीला १५ वर्षांच्या करारावर हे व्यवस्थापन दिले जाणार आहे. त्यानंतर कामगिरीचा आढावा घेऊन आणखी १५ वर्षे मुदतवाढ देण्याचा पर्याय ठेवण्यात आल्याने कराराचा एकूण कालावधी ३० वर्षांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या योजनेअंतर्गत दहिसर पश्चिम, चांदिवली, अंधेरी पूर्व, खार पश्चिम, मानखुर्द आणि विक्रोळी पश्चिम येथील प्रसूतिगृहांचा समावेश आहे. यात दहिसर येथील १५ ते २५ खाटा, चांदिवलीतील ४५ ते ५५ खाटा, अंधेरी पूर्वेतील ७० ते ८० खाटा, खार पश्चिमेतील १५ ते २० खाटा, मानखुर्द येथील २५ ते ३५ खाटा आणि विक्रोळी पश्चिमेतील ४५ ते ५५ खाटांच्या प्रसूतिगृहाचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रासाठी पालिकेने स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. खासगी संस्थांच्या अनुभवाचा वापर करून या केंद्रांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून दिले जातील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, ही प्रसूतिगृहे खासगी हातात गेल्यास उपचारांचा खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे या केंद्रांवर अवलंबून असल्याने खासगीकरणानंतर मोफत व सवलतीच्या दरातील सेवा कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेसचा विरोध
पालिकेच्या प्रसूतिगृहांच्या खासगीकरण धोरणाला काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांनी विरोध केला असून, ही संपूर्ण निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या विषयावर आरोग्य विभागाच्या उपआयुक्तांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतल्यानंतरच पुढील अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे पालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्पष्ट केले.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.