‘भांडुपची राजमाता’ कागदातून साकार
नवदुर्गोत्सवाच्या १३व्या वर्षी पर्यावरणपूरक उपक्रम; कागदाचा लगदा, टिश्यू पेपरपासून चार फुटांची मूर्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भांडुपमध्ये प्रथमच कागदापासून तयार केलेल्या देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नवदुर्गोत्सवाच्या १३व्या वर्षी राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे यंदाचा उत्सव विशेष ठरला आहे. ‘भांडुपची राजमाता’ या संकल्पनेतून साकारलेली ही पर्यावरणपूरक देवीची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
वर्षानुवर्षे गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तींचे विविध प्रयोग पाहिल्यानंतर देवीच्या उत्सवातही असाच अभिनव प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. याच विचारातून मंडळाचे विश्वस्त प्रवीण तोरणे यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून कागदी देवीच्या मूर्तीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. या संकल्पनेला मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सहकार्य केले.
सायन येथील मूर्तिकार तन्मय खटके यांनी ही चार फूट उंचीची आकर्षक मूर्ती साकारली आहे. कागदाचा लगदा, टिश्यू पेपर आणि डिंक यांच्या मिश्रणातून मूर्ती तयार करण्यात आली असून, योग्य प्रक्रिया करून ती सुकवून अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. ही मूर्ती मुंबईतच तयार करण्यात आली आहे. लाल-पिवळ्या साडीतील देवी, सुवर्ण मुकुट, कागदापासून बनवलेला सिंह आणि भव्य महालाची सजावट यांमुळे ‘भांडुपची राजमाता’चे रूप अधिकच आकर्षक झाले आहे.
पर्यावरण संवर्धन, धार्मिक परंपरांचा सन्मान
नवदुर्गोत्सवाच्या १३व्या वर्षी मंडळाने उचललेले हे पाऊल केवळ एक वेगळा प्रयोग नसून, पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक परंपरांचा सन्मान जपण्याचा संदेश देणारे आहे. भांडुपमध्ये कागदी देवीच्या मूर्तीच्या स्थापनेचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा मंडळाचा दावा असून, या उपक्रमामुळे आगामी काळात अधिकाधिक मंडळांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.