संविधान हे देशाच्या प्रगतीचे साधन
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; ‘स्मार्ट नागरिक’, ‘विद्यार्थी प्रेरणा’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ‘संविधान हे भारताच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. संविधानातील मूल्ये आत्मसात केली, तर विद्यार्थी केवळ स्मार्ट नागरिकच नव्हे, तर विकसित भारताच्या उभारणीत योगदान देणारे जबाबदार नागरिक बनतील,’ असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेच्या ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ उपक्रमांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत (स्मार्ट नागरिक)’ या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचे ‘स्मार्ट नागरिक’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, महेश सावंत, कालिदास कोळंबकर, शिक्षण समिती सभापती राजश्री शिरवडकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘शिक्षणामुळे समाजाला समर्पित आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडले तरच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळेल. भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून, त्यातील तत्त्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे आवश्यक आहे. समता, न्याय आणि समान संधी या मूल्यांच्या आधारे विविध भाषा, जाती, धर्म आणि संस्कृती असलेल्या देशाला एकत्र ठेवण्याचे काम संविधान करते. ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज आहे.’
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-जमातींना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या उभारणीतील मूल्ये आणि भारतीय संविधानाने दिलेली तत्त्वे यांच्या आधारे समाज आणि देशासाठी काम करता येते,’ असेही फडणवीस यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या मैदानांचे महत्त्व अधोरेखित करताना मुंबईत अधिकाधिक मैदाने खेळण्यासाठी खुली करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यघटनेमुळे देशाची एकता आणि अखंडता टिकून राहण्यास मदत झाली. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, पर्यावरणाची काळजी आणि नागरिक म्हणून कर्तव्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, असे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट केले.
----
गुणवंतांचे कौतुक
आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना संधींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महापालिकेने ५० गुणवंत विद्यार्थ्यांना सिंगापूर येथे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) विषयांच्या अभ्यासदौऱ्यावर पाठवण्याच्या नियोजनाचे भूषण गवई यांनी कौतुक केले.
---
जानेवारीत परीक्षा
‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तकावर आधारित मराठी भाषेतील परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये घेण्याचा मानस असून, विजेत्या विद्यार्थ्यांचा १४ एप्रिल २०२७ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गौरव करण्यात येणार असल्याचेही महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.