विद्याविहार उड्डाणपुलाच्या खर्चात १० कोटींची वाढ
इमारती वाचवण्यासाठी मूळ आराखड्यात फेरफार; प्रकल्प खर्च आता १०६ कोटींवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विद्याविहार रेल्वे स्थानकावर लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्ग आणि रामकृष्ण चेंबूरकर (आरसी) मार्ग यांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या बांधकामात फेरफार करण्यात आल्याने या प्रकल्पाच्या खर्चात १० कोटी ६२ लाखांची वाढ झाली आहे. बाधित होणाऱ्या चार इमारती आणि ५३ कुटुंबांचे विस्थापन टाळण्यासाठी स्थानिक खासदारांच्या मागणीनुसार पुलाच्या पोहोच रस्त्याची रेषा वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च ९५.५५ कोटींवरून १०६.१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या वाढीव खर्चाला मंजुरी मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर केला आहे.
विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्यांचे काम करण्यासाठी महापालिकेने २८ डिसेंबर २०२३ रोजी मे. ए. बी. इन्फ्राबिल्ड लिमिटेड या कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. मूळ कंत्राट किंमत ७६.१८ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने पूर्ण करून ऑगस्ट २०२६ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. रेल्वे हद्दीतील गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम मे २०२४ मध्येच पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार पश्चिम बाजूस ३६.५० मीटर रुंदीची रस्ता रेषा प्रस्तावित होती. मात्र, यामुळे चार इमारतींमधील ५३ सदनिकाधारक बाधित होत होते. स्थानिक खासदार संजय दिना पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने मूळ आराखड्यात बदल करून पोहोच रस्त्याची रेषा वळवली. या फेरबदलांमुळे कामामध्ये अतिरिक्त बाबींचा समावेश करावा लागल्याने कंत्राटदाराचा मूळ खर्च ८४.९४ कोटी रुपयांवर गेला आहे.
तांत्रिक फेरतपासणीचे काम वाढल्याने सल्लागार मे. टी. पी. एफ. इंजिनिअरिंग प्रा. लि. यांच्या शुल्कातही ११ लाख चार हजार रुपयांची वाढ होऊन सुधारित शुल्क १.१८ कोटी रुपये झाले आहे. पर्यवेक्षण, मलनिस्सारण व पाणीपट्टी आकारासह प्रकल्पाचा सुधारित खर्च १०६ कोटी १८ लाख २० हजार रुपयांवर गेला असून, यास मंजुरी देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.