शिवसेनेचा आज दसरा मेळावा
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष; सहा दशकांची ‘ठाकरी’ परंपरा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शिवसेनेच्या सहा दशकांच्या राजकीय परंपरेचा वारसा सांगणारा दसरा मेळावा मंगळवारी (ता. २०) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या स्थापनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, मतचोरीचे आरोप, निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांची आंदोलने आणि त्यावरील सरकारची भूमिका, तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी राजकीय आव्हाने आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे यांच्याबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. या मेळाव्यासाठी शिवतीर्थावर भव्य व्यासपीठ उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार, आमदार, उपनेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख आणि महिला पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
संविधान रक्षणाची मशाल बनून या!
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून व्हिडिओ टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, वाजत-गाजत गुलाल उधळत या!’ असा संदेश या टीझरमधून देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात संविधान रक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.