सेन्सेक्स ८७६ अंशांनी घसरला
खासगी बँका, आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव
मुंबई, ता. १९ : खासगी बँका आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची तेजी आज थांबली. सेन्सेक्स ८७६.३७ अंशांनी, तर निफ्टी २५७.२० अंशांनी घसरला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्यापेक्षा अधिक घट झाली.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जागतिक शेअर बाजारांतही संथ वातावरण होते. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. व्यवहार सुरू होताच प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. दिवसभर विक्रीचा दबाव कायम राहिल्याने दिवसअखेर सेन्सेक्स ७३,८५२.९० अंशांवर, तर निफ्टी २२,८८५.९५ अंशांवर बंद झाला.
पुढील वर्षभरात खासगी बँकांच्या नफ्याबाबत चिंता व्यक्त होत असल्याने त्यांच्या शेअरमध्ये विक्री झाली. आयटी कंपन्यांच्या शेअरमध्येही घसरण झाली, मात्र चांगल्या कामगिरीमुळे सरकारी बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सरकारी बँकांचा निर्देशांक सव्वादोन टक्क्यांनी वाढला. याउलट एफएमसीजी आणि आयटी निर्देशांक सव्वा टक्क्याने, तर खासगी बँकांचा निर्देशांक पावणेदोन टक्क्यांनी घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांतही एक टक्क्याची घट झाली.
बाजारातील एकूण २,९२५ शेअरचे भाव घसरले, तर १,१६३ शेअरचे भाव वाढले. १८१ शेअरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
सेन्सेक्समधील केवळ चार शेअर तेजीत राहिले, तर मारुतीचा भाव स्थिर होता. उर्वरित २५ शेअरमध्ये घसरण झाली. स्टेट बँक आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर एक टक्क्याने वाढले. लार्सन अँड टुब्रो आणि इंडिगोच्या शेअरमध्येही सुमारे अर्धा टक्का वाढ झाली.
दुसरीकडे, ॲक्सिस बँकेचा शेअर पावणेचार टक्क्यांनी घसरला. अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, बजाज फायनान्स, ट्रेंट, एनटीपीसी, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. बजाज फिनसर्व्ह, एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअरही एक टक्क्यापेक्षा अधिक घसरले.
----
शेअर बाजारात चढ-उतार सुरू असले, तरी आगामी तिमाहीत कंपन्यांच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितताही कायम असल्याने गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत.
- विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.