दसरा मेळाव्यातून पुढच्या पिढीला शिवसेनेचे धडे
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला चिमुकल्यांची उपस्थिती
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : हातात भगवा झेंडा, नजरेसमोर व्यासपीठ आणि सोबतीला आई-वडील... शिवाजी पार्कवरील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात अनेक शिवसैनिक आपल्या मुलांना घेऊन आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, शिवसेनेचा इतिहास आणि मराठी अस्मितेच्या लढ्याची माहिती मुलांना व्हावी, यासाठी त्यांना मेळाव्यात आणल्याचे या पालकांनी सांगितले. काहींसाठी हा अनेक वर्षांपासून जपलेला कौटुंबिक आणि राजकीय परंपरेचा भाग होता, तर काहींना मुलांनी प्रत्यक्ष राजकीय वातावरण अनुभवावे, असे वाटत होते.
आजच्या जेन-झी पिढीपर्यंत सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांतून विविध राजकीय विचार पोहोचतात. त्यामुळे एका बाजूला पालकांची राजकीय निष्ठा आणि परंपरा, तर दुसऱ्या बाजूला माहितीच्या अनेक स्रोतांतून स्वतःची मते बनवण्याची संधी, असे चित्र आहे. राजकीय वारसा पुढे नेताना नव्या पिढीची विचार करण्याची पद्धत आणि बदलते दृष्टिकोन यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांतून राजकीय घडामोडींची माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहण्याचा अनुभव वेगळा असतो. नेत्यांची भाषणे, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि सभेचे वातावरण यांमधून मुलांना राजकीय घडामोडींची प्रत्यक्ष ओळख होते. काही पालकांनी याच कारणासाठी मुलांना मेळाव्यात आणल्याचे सांगितले. विरार येथील शिवसैनिक दिनेश खळे यांनी सांगितले, ‘‘आम्ही लहानपणापासून दसरा मेळाव्याला येतो. मुलांनाही हा मेळावा, शिवसेनेचा इतिहास आणि बाळासाहेबांचे विचार जवळून समजावेत, म्हणून त्यांना सोबत आणले.’’ तसेच सातारा येथील विलास वसंत भणगे म्हणाले, ‘‘मराठी माणसासाठी शिवसेनेने केलेला संघर्ष मुलांना समजावा, अशी आमची इच्छा आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे महत्त्व त्यांना लहानपणापासून कळावे, म्हणून मुलांना मेळाव्यात आणले.’’
आजूबाजूला काय घडते, राजकीय नेते कोणते मुद्दे मांडतात, हे मुलांनी प्रत्यक्ष अनुभवावे. केवळ मोबाईलवर माहिती पाहण्यापेक्षा अशा कार्यक्रमांतून त्यांना समाजाची ओळख होते.
- पांडुरंग नारकर, रत्नागिरी
दसरा मेळावा आमच्यासाठी भावनेचा विषय आहे. ही परंपरा पुढच्या पिढीलाही माहीत व्हावी आणि मुलांनी मोठे झाल्यावर स्वतः विचार करून आपली भूमिका ठरवावी, म्हणून त्यांना सोबत आणले.
- यशवंत बडे, शिवसैनिक, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.