साकीनाक्यात भंगार गोदामाला आग; चौघे भाजले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथील अब्दूल रशीद कंपाउंडमधील भंगार साहित्याच्या गोदामाला मंगळवारी (ता. २०) सायंकाळी आग लागली. या घटनेत चौघे भाजले असून, त्यापैकी एका २० वर्षीय तरुणाचे शरीर ८० टक्के भाजले आहे. अन्य दोघे ४० टक्के, तर एक जण १० टक्के भाजला आहे. चौघांवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाला मंगळवारी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी लेव्हल-२ आग घोषित केली. राजावाडी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत तौफिक शादिल कुरेशी (२०) हा ८० टक्के भाजला आहे. जाहिद अबिदुल्ला कुरेशी (२०) आणि कमाल जलालुद्दीन शाह (४७) हे प्रत्येकी ४० टक्के, तर लालचंद रामलखन गौतम (४०) हे १० टक्के भाजले आहेत. चौघांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. आगीचे नेमके कारण आणि गोदामातील नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.