मुंबई

वाडिया बाल रुग्णालयात प्रथमच बालहृदय प्रत्यारोपण

CD

वाडिया बाल रुग्णालयात प्रथमच बालहृदय प्रत्यारोपण
मृत्यूच्या दारातून तन्मयला नवजीवन; ग्रीन कॉरिडॉरमुळे २३.९ किमीचा प्रवास २५ मिनिटांत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : हृदयाची कार्यक्षमता अवघी १० ते १५ टक्क्यांवर घसरल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या नवी मुंबईतील घणसोली येथील १७ वर्षीय तन्मय शिंदेला हृदय प्रत्यारोपणामुळे नवजीवनाची आशा मिळाली आहे. मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये प्रथमच बालहृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मेंदूमृत २२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तन्मयला जीवनाची नवी संधी मिळाली.
तन्मयला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी या हृदयविकाराचे निदान झाले होते. या आजारामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाली. सुरुवातीला २५ ते ३० टक्के असलेली हृदयाची कार्यक्षमता पुढे १० ते १५ टक्क्यांवर आली. धाप लागणे, छातीत दुखणे आणि थकवा यामुळे त्याचे शिक्षणही थांबले. १५ डिसेंबर २०२५ रोजी त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असतानाच त्याचे नाव झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आले.
६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात २२ वर्षीय मेंदूमृत तरुणाचे हृदय उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर आवश्यक तपासण्या आणि नियमानुसार वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने मुलुंड ते परळ हे २३.९ किलोमीटरचे अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करण्यात आले. हृदय रुग्णालयात पोहोचताच प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. सुमारे तीन तासांच्या प्रक्रियेनंतर तन्मयच्या शरीरात प्रत्यारोपित हृदयाने नियमितपणे कार्य सुरू केले.
शस्त्रक्रियेनंतर तन्मयला सात दिवस अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. हृदय शरीराने स्वीकारले आहे की नाही, हे तपासण्यासाठी बायोप्सी करण्यात येणार असून, संसर्गापासून बचाव आणि प्रत्यारोपित हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतील.
तन्मयचे वडील अशोक शिंदे बसचालक असून, आई सुजाता गृहिणी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारांचा खर्च उभा करणे कठीण होते; मात्र निधी संकलनातून त्याची व्यवस्था करण्यात आली. पुढील वर्षी बारावीची परीक्षा देऊन शिक्षण सुरू करता येईल, अशी आशा पालकांनी व्यक्त केली.

३०० बालकांवर नियमित देखरेख
डॉ. पांडा यांनी बालरुग्णांसाठी योग्य दात्याचे हृदय मिळणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगत अवयवदानाबाबत जनजागृतीचे आवाहन केले. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी या यशामुळे बालकांवरील प्रगत प्रत्यारोपण उपचारांना नवी दिशा मिळाल्याचे सांगितले. रुग्णालयाच्या विशेष केंद्रात सध्या सुमारे ३०० हृदयविकारग्रस्त बालकांवर उपचार आणि नियमित देखरेख केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

Deepinder Goyal: तुमच्या मनातलं गुपीत एआयला सांगा, कंपनीलाही वाचता येणार नाहीत तुमच्या चॅट्स! AIच्या मार्केटमध्ये आता 'झोमॅटो'ची एन्ट्री

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune Prison Police Recruitment : पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्याची प्रक्रिया संथ; उमेदवारांमध्ये नाराजी

Kondhwa News : कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

SCROLL FOR NEXT