विकासासाठी हिरवाईचा बळी!
जीएमएलआरच्या कामासाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; सामाजिक संघटनांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या (जीएमएलआर) कामावरून आता पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल एक हजार ५२४ झाडांवर कुऱ्हाड चालविण्याच्या प्रस्तावाला विरोध होत आहे. एकीकडे मुंबईत वाढते तापमान, वायुप्रदूषण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण असताना दुसरीकडे विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची हानी होत असल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वृक्षतोडीविरोधात सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून, विरोधाची धार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वॉचडॉग फाउंडेशनने वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे. मुंबई महापालिकेने जीएमएलआरच्या प्रस्तावित कामासाठी वृक्षतोड आणि पुनर्रोपणासंदर्भातील नोटिसा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार, पश्चिम द्रुतगती महामार्गापासून ऐरोली टोलनाक्यापर्यंतच्या प्रस्तावित कामासाठी ६९५ झाडे तोडण्यात येणार आहेत, तर ६६६ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय पूर्व द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जंक्शनच्या सुधारणा कामाचाही या प्रस्तावात समावेश आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षहानी होणार असल्याने विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समतोल राखण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ कमी होण्यास, वाहतूक कोंडीवर उपाय मिळण्यास आणि नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे, मात्र या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे कितपत योग्य आहे, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
विकासकामांना विरोध करण्यापेक्षा पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, अशा पर्यायांचा विचार करणे आवश्यक असल्याचे वॉचडॉग फाउंडेशनने म्हटले आहे. प्रकल्पाची आखणी करताना झाडांचे संरक्षण, पर्यायी मार्गांचा विचार आणि वृक्षहानी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये झाडांची संख्या कमी झाल्यास उष्णतेची तीव्रता वाढण्याचा धोका असतो. जीएमएलआरच्या कामामुळे मुंबईच्या पर्यावरणाचे आणि पर्यावरणीय संतुलनाचे अपरिवर्तनीय नुकसान होण्याची भीती वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली शहरातील उरलेल्या हरित क्षेत्राचा बळी देऊ नये, असे आवाहन संस्थेने केले आहे.
पुनर्रोपणावर प्रश्नचिन्ह
पुनर्रोपण केलेली झाडेही जुन्या, मोठ्या वृक्षांप्रमाणे तत्काळ सावली आणि पर्यावरणीय लाभ देऊ शकत नाहीत. पुनर्रोपणानंतर झाडे किती प्रमाणात जगतात, त्यांची योग्य देखभाल होते का आणि त्यांची वाढ व्यवस्थित होते का, यावरही पर्यावरणीय लाभ अवलंबून असतात. त्यामुळे केवळ पुनर्रोपणाचा आकडा जाहीर करून वृक्षहानीची भरपाई झाल्याचे मानता येणार नाही, अशी भूमिका पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनांकडून मांडली जात आहे.
ऑक्टोबर हीटचा अनुभव
मुंबईत ऑक्टोबर महिन्यातही उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. शहरातील वाढते तापमान, वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि वायुप्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत झाडे ही केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारी नैसर्गिक संपत्ती नसून तापमान नियंत्रित ठेवणे, कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे, हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणे आणि पक्षी व अन्य जीवांना अधिवास उपलब्ध करून देणे, अशा महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मोठ्या प्रमाणावर झाडे हटविल्यास या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पर्यायी मार्ग शोधावेत
वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावी. पर्यावरणाची हानी कमीत कमी होईल, असे पर्यायी मार्ग शोधावेत, अशी मागणी फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस आल्मेडा, ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.