मुंबई

कुलाबा कॉजवेवर फेरीवाल्यांची मांडणी एकसमान

CD

कुलाबा कॉजवेवर फेरीवाल्यांची मांडणी एकसमान
९१ स्टॉल्समुळे परिसराच्या सौंदर्यात भर; पादचाऱ्यांनाही दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : ऐतिहासिक कुलाबा कॉजवे परिसराला एकसमान आणि आकर्षक स्वरूप देण्याबरोबरच पादचाऱ्यांची ये-जा सुलभ करण्यासाठी महापालिकेने ९१ एकसमान फेरीवाला स्टॉल्स उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी महापालिकेने दोन कोटी २८ लाख रुपयांचे कंत्राट मंजूर केले आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, पात्र फेरीवाल्यांना एकसमान स्टॉल्स उपलब्ध करून देणारा कुलाबा हा मुंबईतील पहिला परिसर ठरणार असल्याचा दावा भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.
कुलाबा कॉजवे परिसराच्या विकासाची संकल्पना २०२४ मध्ये मांडण्यात आली होती. त्यामध्ये फेरीवाल्यांसाठी एकसमान स्टॉल्स, दुकानांचे एकसारखे नामफलक आणि रस्त्यांवरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा समावेश होता. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाब्याचे स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांच्या प्रयत्नांतून डीपीडीसी निधीद्वारे या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.
या कामाचे कंत्राट मे. पुष्पम इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्येक स्टॉलचा आकार अंदाजे एक मीटर बाय एक मीटर असणार आहे. क्यूआर कोडवर आधारित ओळखपत्रे असलेल्या पात्र फेरीवाल्यांना हे स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्टॉल्सची रचना एकसमान ठेवल्यामुळे परिसरातील फेरीवाला व्यवसायाला शिस्त लागण्याबरोबरच पादचाऱ्यांना चालण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
कुलाबा कॉजवे हा मुंबईतील प्रमुख खरेदीचा परिसर असून, येथे दररोज मोठ्या संख्येने मुंबईकर आणि परदेशी पर्यटक भेट देतात. या भागातील फेरीवाला व्यवसाय अधिक सुव्यवस्थित करण्यासोबतच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी एकसमान स्टॉल्सचा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कुलाबा कॉजवेचे पर्यटन आकर्षण वाढण्यास आणि खरेदीचे केंद्र म्हणून त्याची ओळख अधिक ठळक होण्यास मदत होईल, असा विश्वास मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केला.

परिसराचे सौंदर्य वाढण्यास मदत
या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या स्टॉलचा नमुना यापूर्वी कुलाबा कॉजवे येथे ठेवण्यात आला होता. येत्या काही आठवड्यांत पहिल्या टप्प्यातील स्टॉल्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सर्व स्टॉल्सची रचना आणि मांडणी एकसमान ठेवल्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल. तसेच फेरीवाला व्यवसाय आणि पादचाऱ्यांची मुक्त ये-जा यांच्यात समन्वय साधता येईल, असे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT