कक्कय्या समाजाच्या गणेशोत्सवाची ८३ वर्षांची परंपरा
गणरायाच्या उत्सवातून शाळा, समाजोपयोगी उपक्रमांना बळ
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. १५ (बातमीदार) : धारावी वसाहत निर्माण होत असताना मराठी माणूस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून धारावीत येऊन वसू लागला. असाच एक समाज म्हणजे कक्कय्या (ढोर), जो चामडे कमावण्याचा परंपरागत असलेला व्यवसाय धारावीत करू लागला. यात जम बसू लागल्यावर कक्कय्या (ढोर) समाजाला एकत्र आणण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वी १९४३ साली समाजातील काही शिक्षित व होतकरू तरुणांनी धारावीत कक्कय्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली.
संपूर्ण कक्कय्या (ढोर) समाज या गणपतीचा मान ठेवून मनोभावे गणेशोत्सव साजरा करतो. धारावीमधील शिवपंच हे कक्कय्या समाजाचे मंदिर आहे. इथेच कक्कय्या समाज मंडळाची स्थापना करण्यात आली. पहिला गणेशोत्सव या मंदिरात साजरा करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान राखत या मंडळाकडून १९७५ साली धारावीतील पहिली शाळा सुरू करण्यात आली.
कक्कय्या-ढोर समाजाच्या सात फळी धारावीमध्ये होत्या. सात फळी म्हणजे सात जिल्ह्यांचे लोक या धारावीत प्रामुख्याने राहत होते. त्यांच्या सात तालमी होत्या. कुस्त्या, ढाल पट्टा इत्यादी खेळ त्या तालमीत चालत. महाराष्ट्रभरातून समाजातील सर्वच थरांतून याकामी आर्थिक मदत मिळाली होती. त्या काळच्या एक पैशापासून ते मोठ्या रकमेची मदत अनेकांनी आनंदाने दिली होती. आजही गणेशोत्सवाला समाजातून भरभरून योगदान दिले जाते.
विसर्जनाला जाताना धारावीतील कोळी समाज या गणपतीला आजही कंटीमाळेचा मान देतात. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. कक्कय्या समाज मंडळाचे नामांतर ‘संत कक्कय्या विकास संस्था’ असे करून १९७० मध्ये शाळा स्थापन केली. संस्थेचे पहिले अध्यक्ष ॲड. सखाराम शेरखाने, तर सचिव नारायण दादू नारायणकर होते.
मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव मंडळ व शाळेची संस्था याची दोन वेगवेगळी विश्वस्त मंडळे आहेत. त्यामुळे समाजातील अनेकांना सामाजिक काम करण्याची संधी मिळते.
मंडळातर्फे पहिल्यापासून सहा फुटांपर्यंतची मूर्ती स्थापन केली जाते. उंचीच्या स्पर्धेत मंडळाला रस नाही. गणेशमूर्तीच्या आगमनावेळी व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्याकडे कल असतो.
आमचे मंडळ शांतताप्रिय आहे. शाळेच्या आवारात बाप्पाची स्थापना होत असल्याने दिवसभर कोणताही गोंगाट होत नाही. संध्याकाळी दररोज विविध कार्यक्रम राबवले जातात; जेणेकरून सर्व समाज एकत्र येईल.
- हेमंत व्हटकर,
अध्यक्ष, कक्कय्या समाज मंडळ
गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मंडळात तरुण मंडळींना स्थान दिले जात आहे. समाजोपयोगी खासगी व शासकीय उपक्रम गणेशोत्सवादरम्यान राबवले जातात; जेणेकरून कक्कया व अन्य समाजाला त्याचा फायदा व्हावा.
- मसाजी होटकर, सचिव, कक्कय्या समाज मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.