महालक्ष्मी पुलाजवळ
तीन वाहनांची धडक; दोघे जखमी
कासा, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे येथील महालक्ष्मी पुलाजवळ शुक्रवारी (ता. ९) दुपारी तीनच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने पुढील कारला धडक दिली. त्यानंतर हा ट्रक विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या चालक केबिनवर आदळला. या अपघातात एका ट्रकचालकाला गंभीर, तर दुसऱ्या ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत रामचंद्र भोये (वय ३२, रा. चंद्रनगर, वाणगाव, ता. डहाणू) हे एमएच ४८ डीडी ७६४२ क्रमांकाची कार घेऊन गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांच्या कारच्या मागून विजय विश्वनाथ यादव (वय ३५, रा. उत्तर प्रदेश) हे जीजे १९ वाय १६७६ क्रमांकाचा ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. विवळवेढे येथील महालक्ष्मी पुलाजवळ ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने कारला मागून धडक दिल्यानंतर तो रस्ता ओलांडून मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एमएच ४८ एजी ६५३१ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाच्या केबिनवर आदळला.
या अपघातात दुसऱ्या ट्रकचे चालक जितेंद्र कुमार राजेंद्र साव (वय २९, रा. हेमंतपूर, ता. फत्तेपूर, जि. गया, बिहार) यांच्या चेहऱ्यावर तसेच हातापायांना दुखापत झाली. त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदान्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ट्रकचालक विजय यादव यांचे कपाळ, डाव्या हाताचा पंजा आणि उजव्या मनगटाला दुखापत झाली. त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी कासा पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.