पूर्णेकर हत्याकांड
पाच कोटींच्या सुपारीची पडताळणी
टल्ली, अमित सिंगची पोलिसांकडून चौकशी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पाच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आणि राजकीय व्यक्तीच्या कथित सहभागाबाबतच्या चर्चेची पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे. या प्रकरणातील संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग या दोन संशयितांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी अटक केलेले तीन आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने या दोघांच्या चौकशीतून हत्येमागील कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या दोघांना रविवारी (ता. १०) ठाण्यात आणून सोमवारी (ता. ११) न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या घटक पाचच्या पथकाने अन्य पथकांच्या मदतीने प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाट परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. संशयितांचे मोबाईल लोकेशन मिळत नसल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. अखेर नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे केलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले.
दरम्यान, हत्येसाठी वापरण्यात आलेली अल्टो कार नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालय परिसरातून जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी पळून जाण्यासाठी वाहन बदलले होते का, याचाही तपास सुरू आहे. टल्ली आणि अमित सिंग यांना ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या चौकशीतून संभाव्य सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि मदतगारांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याकडे तपास पथकाचे लक्ष लागले आहे.
सुपारीच्या आरोपाची पडताळणी
पूर्णेकर यांच्या हत्येसाठी पाच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आणि या प्रकरणात एका राजकीय व्यक्तीचे नाव समोर येत असल्याच्या चर्चेची पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे. मात्र, या आरोपांना तपासातून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर हत्येचा कट, आर्थिक व्यवहार आणि अन्य संशयितांशी असलेले संबंध तपासले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आरोपींना मदत करणाऱ्यांचाही शोध
या हत्या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. मात्र, ते तपासात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हत्येच्या कटात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. आरोपींना पळून जाण्यास किंवा लपून राहण्यास मदत करणाऱ्यांची भूमिकाही तपासली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.