रिक्षातळावर दुचाकींचा कब्जा
चालकांची गैरसोय; तोडगा काढण्याची मागणी
जुईनगर, ता. १२ (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रिक्षातळावर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग होत असल्याने रिक्षाचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रिक्षांसाठी राखीव असलेल्या जागेवर दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने रिक्षा उभ्या करण्यास जागा अपुरी पडत आहे. यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, सिडको प्रशासन आणि विभागीय वाहतूक नियंत्रण कक्षाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालक-मालकांकडून होत आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. प्रवाशांना सहज रिक्षा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सिडको प्रशासनाने येथे स्वतंत्र रिक्षातळाची व्यवस्था केली आहे. मात्र, रिक्षातळाचा दर्शनी फलक खराब झाल्याने काही दुचाकीस्वार या जागेवर वाहने उभी करून निघून जात असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे परिसरात दुचाकी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असतानाही रिक्षातळावर दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी, प्रवाशांना रिक्षा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असून, स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
रिक्षातळावरील अनधिकृत पार्किंगमुळे रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
‘‘दुचाकी आणि रिक्षाचालक यांच्यातील वाद चिघळण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने पर्यायी मार्ग काढावा,’’ अशी मागणी रिक्षाचालक अरविंद म्हात्रे यांनी केली.
रिक्षातळाचा फलक दुरुस्त करून तो स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावावा, अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सिडको प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण विभागाने संयुक्त पाहणी करून रिक्षातळ अतिक्रमणमुक्त ठेवावा तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.