महापौर मॅरेथॉनच्या कंत्राटावरून वाद
मंत्र्यांच्या ओएसडीशी संबंधित संस्थेला काम देण्याच्या हालचालींचा आरोप; शिवसेनेचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २७ डिसेंबरला आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नवी मुंबई महापौर मॅरेथॉन’च्या कंत्राटावरून वाद निर्माण झाला आहे. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी या क्रीडा महोत्सवाची अधिकृत घोषणा केली असून, धावपटूंचा आवडता मार्ग मानल्या जाणाऱ्या पाम बीच रोडवर रंगणाऱ्या या स्पर्धेत तब्बल १० हजारांहून अधिक नागरिक व धावपटू सहभागी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; मात्र मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया न राबवता एका मंत्र्याच्या ओएसडीशी संबंधित महिलेच्या संस्थेला काम देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे. या कथित हस्तक्षेपावर शिवसेनेचे नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी आक्षेप घेतला आहे.
महापालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीच्या वतीने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. पाम बीच रोडवर होणाऱ्या या स्पर्धेत १० हजारांहून अधिक नागरिक आणि धावपटू सहभागी होण्याचा अंदाज आहे. आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयोजनासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवून किंवा पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट देण्याऐवजी विशिष्ट संस्थेला काम देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप आहे. संबंधित संस्थेला मोठ्या मॅरेथॉनच्या आयोजनाचा पूर्वानुभव नसल्याचेही म्हात्रे यांनी निदर्शनास आणले आहे. दुसऱ्या अनुभवी संस्थेचा आधार घेऊन काम मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मर्जीतील आणि बिनअनुभवी संस्थांच्या दावणीला महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम न बांधता, खऱ्या अर्थाने देशासाठी आणि राज्यासाठी दर्जेदार धावपटू तयार करणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकृत संस्थांनाच या मॅरेथॉनच्या आयोजनाचे कंत्राट देण्यात यावे, अशी जोरदार मागणी नगरसेवक अनिकेत म्हात्रे महापालिका प्रशासनाकडे करणार आहेत. त्यामुळे २७ डिसेंबरला पाम बीचवर धावपटूंचा उत्साह पाहायला मिळणार असला, तरी त्याआधी प्रशासकीय दरबारी पारदर्शकतेचा लढा कसा रंगतो आणि महापालिका आयुक्त या राजकीय हस्तक्षेपावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर
महापौर मॅरेथॉनसाठी लवकरच नावनोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे; मात्र कंत्राट प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे आयोजनाच्या पारदर्शकतेवर चर्चा सुरू झाली आहे. निविदेतील नियम व अटींचे काटेकोर पालन करून सक्षम आणि अनुभवी संस्थेची निवड करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित आरोपांवर महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.