श्री रत्नेश्वरी देवी
उरण तालुक्यातील जसखार गावाची सर्वश्रुत आणि आराध्य ग्रामदेवता म्हणजे श्री रत्नेश्वरी देवी. सुमारे १५० वर्षांचा इतिहास लाभलेल्या या देवीच्या प्रकटीकरणाची कथा, मंदिराची स्थापना आणि दरवर्षी चैत्र कालाष्टमी-नवमीला साजरा होणारा यात्रोत्सव आजही गावकऱ्यांच्या श्रद्धेचा व संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जसखार गावात शेती, आगरकाम आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय होते. पाणीटंचाईमुळे शेतीला अडचणी येत असल्याने गावकऱ्यांनी आजच्या जेएनपीए वसाहतीच्या परिसरात तलाव खोदण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान, एका शेतकऱ्याच्या स्वप्नात देवीने तलावात आपले वास्तव्य असल्याचे सांगितले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी नव्या उत्साहाने खोदकाम सुरू ठेवले. अखेर चैत्र अष्टमी अर्थात कालाष्टमीच्या दिवशी तलावात देवीची मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मूर्ती स्वच्छ करून वाजतगाजत आणले. देवीच्या मूर्तीचे रूप आणि रत्नासारखे तेज पाहून गावातील प्रतिष्ठित मंडळींनी तिला ‘श्री रत्नेश्वरी देवी’ असे नाव दिले. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून तलावाशेजारी छोटेसे कौलारू मंदिर उभारून देवीची स्थापना केली. तेव्हापासून श्री रत्नेश्वरी देवी जसखार गावाची आराध्य ग्रामदेवता बनली आणि तिची श्रद्धापरंपरा पिढ्यान्पिढ्या जपली जाऊ लागली.
चैत्र कालाष्टमी-नवमीला यात्रोत्सवाची परंपरा
देवीच्या प्रकट होण्याचा दिवस चैत्र अष्टमी असल्याने याच दिवशी यात्रोत्सव साजरा करण्याचे त्या काळातील ग्रामस्थांनी ठरविले. पुढे चैत्र कालाष्टमी आणि नवमीला देवीची यात्रा व पालखी सोहळा साजरा करण्याची परंपरा रूढ झाली. आजही ही परंपरा उत्साहाने जपली जाते.
‘लाराची रत्नूबाय’
जसखारची श्री रत्नेश्वरी देवी हा केवळ इतिहास एका मंदिराच्या स्थापनेची कथा नसून गावाच्या श्रद्धेचे प्रतीक, एकजुटीच्या परंपरेची साक्ष आणि पिढ्यान्पिढ्या जपल्या जाणाऱ्या सुमारे दीडशे वर्षांपासून सुरू असलेली श्रद्धापरंपरा आजही गावकऱ्यांना एका धाग्यात बांधते. आगरी-कोळ्यांच्या या आईला लाडाने ग्रामस्थ ‘लाराची रत्नूबाय’ असेदेखील म्हणतात. काळ बदलला, गावाचा परिसर बदलला, जीवनशैली बदलली; मात्र आस्था आणि यात्रेची ओढ कायम राहिली आहे.
संकलन : रसिका म्हात्रे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.