सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : रस्त्यावर ज्येष्ठांना जुन्या ओळखीचे नाटक करून, गोड बोलण्यात गुंतवून तसेच वेगवेगळी बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठाणे गुन्हे शाखेच्या घटक चारच्या पथकाने अटक केली आहे. दिनेश बाबू मंचेकर (वय ३७, रा. महापे, नवी मुंबई) या संशयिताकडून ठाणे पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ तीन आणि चारमधील १७ गुन्ह्यांची उकल केली असून, २४ लाख २४ हजारांचे २१२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. त्याच्यावर मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि ठाणे शहरात एकूण २९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती बुधवारी (ता. १४) ठाण्यातील पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येत होता. या तपासादरम्यान पोलिस हवालदार गणेश गावडे यांना मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत दिनेश मंचेकर याचा गुन्ह्यात सहभाग समोर आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने महापे येथून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
जुन्या ओळखीचे नाटक, त्यानंतर हातचलाखी...
दिनेश मंचेकर हा साथीदारांच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर ज्येष्ठांना लक्ष्य करीत असे. संबंधित व्यक्तींची पूर्वीपासून ओळख असल्याचे भासवून जुन्या आठवणी सांगणे, जवळीक साधणे आणि विश्वास संपादन करणे, अशी त्याची पद्धत होती. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांना बोलण्यात गुंतविले जात असे. यादरम्यान, हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने किंवा त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली जात असे.
दोन संशयितांचा शोध सुरू
या प्रकरणात सुदेश ऊर्फ बाबू तानाजी महादे (वय ५५, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि त्याचे वडील बाबू इरप्पा मंचेकर (वय ६८, रा. ओवळागाव, ता. पनवेल) यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.