समाजसेवेचा ध्यास, माणुसकीचा वारसा!
उद्योग, महिला सक्षमीकरण, युवकांना मार्गदर्शन आणि गरजूंना मदत; सुरक्षा घोसाळकर यांचा विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी प्रवास
दिनेश तर्फे ः सकाळ वृत्तसेवा
जोगेश्वरी, ता. १५ ः वयाच्या ५३व्या वर्षीही सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सक्रिय योगदान देणाऱ्या सुरक्षा घोसाळकर यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. उद्योग, महिला सक्षमीकरण, युवकांना मार्गदर्शन, गरजूंना मदत आणि देशसेवा अशा विविध माध्यमांतून त्या समाजहिताचा ध्यास जपत आहेत. अवयवदानाचा संकल्प असो वा कोरोनाकाळात गरजूंच्या मदतीसाठी केलेले प्रयत्न, प्रत्येक कृतीतून माणुसकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपणाऱ्या घोसाळकर यांचे कार्य इतरांसाठी आदर्श ठरत आहे.
सुरक्षा घोसाळकर या फोकस फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि.च्या संचालिका असून, महाराष्ट्र सैनिक फेडरेशनच्या महिला ब्रिगेडच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाजाच्या चिटणीसपदासह मुंबई मराठा मंदिरच्या बाबासाहेब गावडे रुग्णालयाच्या कार्यकारिणीतही त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अंगणवाडी सेविका निवड समितीच्या माजी अध्यक्षपदासह केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार समितीवर आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या थिंक टँक समितीवरही त्यांनी काम केले आहे.
विद्यार्थी आणि पालकांना व्यक्तिमत्त्व विकास, सुजाण पालकत्व तसेच स्पर्धा परीक्षांसाठी त्या विनामूल्य मार्गदर्शन करतात. तृतीयपंथी, दिव्यांग, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. एअर पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारातही त्या सक्रिय आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळावी, ही त्यांच्या कार्यामागील प्रमुख प्रेरणा आहे.
देशसेवेची भावना त्यांच्या कुटुंबातही रुजलेली आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाला लष्करी अधिकारी म्हणून देशसेवेसाठी समर्पित केल्याचा त्यांना अभिमान आहे. स्वतःच्या ५०व्या वाढदिवशी त्यांनी मरणोत्तर सर्व अवयवदानाचे इच्छापत्र सादर केले. अवयवदानातून दुसऱ्याला नवजीवन मिळू शकते, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांना आणि कर्करोगग्रस्तांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत केली, तर कोरोनामुळे निराधार झालेल्या मुलांच्या संगोपनासाठी बालगृहात व्यवस्था करण्यास हातभार लावला. या कार्याबद्दल विविध संस्थांनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून गौरव केला.
तरुण हा देशाचा कणा असल्याचे मानणाऱ्या घोसाळकर युवकांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी मुंबईत वॉर्डनिहाय औद्योगिक वसाहती उभारण्याची भूमिका मांडतात. स्थानिक पातळीवर उद्योग वाढल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मान
सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र उद्योजिका पुरस्कार, २०१८ मध्ये एमएसएमई इंडिया पुरस्कार आणि २०२० मध्ये रयत शिक्षण संस्थेचा सामाजिक पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय राज्यस्तरीय यशस्वी नवदुर्गा पुरस्कार, द चेंज मेकर्स पुरस्कार, भारत की शान राष्ट्रीय सन्मान, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज सामाजिक पुरस्कार, भारतरत्न गौरव श्री पुरस्कार, शिक्षणमाता मुक्ताई साळवे क्रांतीरत्न पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सन्मान आणि मानवाधिकार समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार, अशा विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.