शिक्षकांची २५ टक्के अशैक्षणिक कामे कमी
शिक्षणमंत्री दादा भुसे : मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सूक्ष्म नियोजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : मराठी माध्यमांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत शिक्षकांची २५ टक्के अशैक्षणिक कामे कमी करण्यात यश आल्याचा दावा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला. शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य शासकीय विभागांकडून शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या कामांचाही आढावा घेऊन हा भार आणखी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘चला शाळेला जाऊया’ अभियानाचा आढावा घेण्यासाठी भुसे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेण्याचे महत्त्व सांगितले.
शाळांमध्ये चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करणे, तसेच पायाभूत सुविधा आणि अन्य सोयीसुविधांची कमतरता असलेल्या शाळा ओळखून त्यावर उपाययोजना करणे, हा अभियानाचा उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या सुधारणांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाला मार्गदर्शन केले होते. राज्यासाठी आदर्श ठरेल, असे शैक्षणिक नियोजन यावेळी मांडण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या गरजा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाच्या आधारे आगामी वर्षभरात ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात ही मोहीम पुढे नेण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
मराठी शाळांवरील विश्वास वाढविणार
मराठी माध्यमांच्या शाळांकडे केवळ स्पर्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज भुसे यांनी व्यक्त केली. काही मराठी शाळांमध्ये अन्य माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रवेशासाठी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठी शाळांचा दर्जा सुधारून त्यांच्याविषयीचा विश्वास अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी त्यांच्यावरील अशैक्षणिक कामे कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले.
……
भेटीआधीच शाळेत दोन टँकरने पाणी
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : महापालिकेच्या शाळा क्रमांक ६२/२२ मध्ये शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटीपूर्वी दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. तब्बल नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या शाळेत विद्यार्थिनींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. ‘चला शाळेला जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे भिवंडीतील या शाळेला भेट देणार होते. त्यापूर्वी शाळेत पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला; मात्र, मंत्र्यांच्या भेटीच्या वेळीच पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ प्रशासनावर का आली, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.