उड्डाणपुलावर धोकादायक बेशिस्त पार्किंग
चारकोप-गोराई मार्गावर अपघाताची शक्यता; विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
कांदिवली, ता. १६ (बातमीदार) ः चारकोप-गोराई मार्गावरील उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अरुंद पुलावरील रस्ता पार्क केलेल्या वाहनांमुळे आणखी अरुंद होत असून, वाहनचालकांसह पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करून पुलावरील मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चारकोप आणि गोराई परिसरात म्हाडा वसाहतींसह मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. या दोन्ही परिसरांना जोडणारा उड्डाणपूल दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, पुलाची अरुंद रचना आणि पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील वळणांमुळे आधीच वाहतुकीच्या अडचणी निर्माण होतात. त्यातच पुलावर आणि जोडरस्त्यांवर दिवसभर वाहने उभी केली जात असल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे.
या मार्गावर शाळा, महाविद्यालये, विधी महाविद्यालय तसेच गोराई आणि चारकोप बस आगारांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांची वर्दळ वाढते. मात्र, पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
पुलावरील अरुंद जागेतून समोरासमोर येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागते. अनेकदा अचानक ब्रेक लावावे लागतात, तर काही वेळा वाहनांना एकमेकांना बाजू देताना अडचणी येतात. मोठ्या बसगाड्यांची ये-जा सुरू असताना हा धोका अधिक वाढतो.
चारकोप-गोराई उड्डाणपुलावरील वाहतुकीचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा राहण्यासाठी वाहतूक पोलिस आणि संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार गिजे याने केली.
फलक लावण्याची गरज
पुलावरील बेशिस्त पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, संबंधित ठिकाणी पार्किंगला मनाई असल्याचे फलक लावण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे, असे वाहतूक पोलिस किरण पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.