कथाकथनातून वाचनाची गोडी
‘हसरी मुले’ कार्यक्रमामुळे पुस्तकांशी मैत्री घट्ट
अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : वाचनातून ज्ञानाची कवाडे खुली होतात, विचारांना दिशा मिळते आणि कल्पनाशक्तीला नवे पंख फुटतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि पुस्तकांशी मैत्री घट्ट व्हावी, या उद्देशाने दी एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हसरी मुले’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध लेखिका मेघना साने आणि हेमंत साने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेघना साने यांनी विविध कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कथाकथनातून त्यांनी वाचनाचे महत्त्व उलगडून सांगतानाच विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे वळण्याची प्रेरणा दिली. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते हे त्यांनी सोप्या शब्दांत पटवून दिले. हेमंत साने यांनी गीतांच्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली.
‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देताना मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन केले. वाचन ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित गोष्ट नसून, जीवन समृद्ध करणारी सवय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी तुषार सोनजे, वागीश वरखेडकर आणि दीपक परब यांच्यासह सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वैशाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर जान्हवी जागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड, सर्जनशीलता आणि वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाचन संस्कृतीचा जागर
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी शाळेच्या ग्रंथालयातील विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांतील पुस्तकांची ओळख करून घेता आली. कथाकथन, गीतांचे सादरीकरण आणि पुस्तक प्रदर्शन अशा उपक्रमांमुळे वाचनाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.