सोनसाखळीसाठी मित्राची हत्या
बऱ्याच दिवसांनी मृतदेह सापडला; दोघे ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : सोन्याची साखळी लुटण्याच्या उद्देशाने दोन अल्पवयीन मित्रांनीच आपल्या १७ वर्षीय मित्राची २४ सप्टेंबरला हत्या केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. बऱ्याच दिवसांनी मृतदेहाचा शोध घेण्यात आला असून, याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना शुक्रवारी (ता. १६) ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत सदाशिव कांबळे यांचा १७ वर्षीय मुलगा २४ सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. तो परत न आल्याने त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, अनेक दिवसांच्या तपासानंतरही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी ब्रह्मांड परिसरात शोधमोहीम राबवत ९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली; परंतू त्यातून काही पुरावे मिळाले नाहीत. अपहरण केलेल्या मुलाचा मोबाईल, त्याचे मित्र, नातेवाईक आणि शाळेतील कर्मचारी यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणातूनही सुरुवातीला तपासाला दिशा मिळत नव्हती. मात्र, संशयित मित्राच्या मोबाईलची तांत्रिक माहिती तपासल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हत्या केल्याचे उघडकीस आले.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ब्रह्मांड परिसरातील झाडींमध्ये शोधमोहीम राबवली. अग्निशमन दलाच्या मदतीने झाडेझुडपे बाजूला केल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. तपासात एका आरोपीला वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी, तर दुसऱ्याला मोटारसायकल खरेदी करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यातून सोन्याची साखळी लुटण्याचा उद्देश ठेवून त्यांनी मित्राची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
----------------------
चौकशीत हत्येचा उलगडा
संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाची पोलिसांनी १५ ऑक्टोबरला पुन्हा चौकशी केली असता आणखी एका मित्रासोबत मिळून हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. २४ सप्टेंबरला रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास त्यांनी मुलाला ब्रह्मांड फेज दोनजवळील निर्जन झाडीमध्ये नेले. तेथे सोन्याची साखळी काढून घेण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकूने वार केले आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली. हत्येनंतर मृतदेह झाडाझुडपांत लपवून ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आल्याचेही तपासात उघड झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.