शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
दिवाळीपूर्वी प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : विद्यार्थ्यांना नियमित शिकवायचे; मात्र स्वतःच्या घरखर्चासाठी वेतनाची प्रतीक्षा करायची, अशी वेळ ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये समायोजित झालेल्या शिक्षकांवर आली आहे. मुंबईतील खासगी शाळांमधून ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. गृहकर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते आणि अन्य आर्थिक देणी भागविताना शिक्षकांची दमछाक होत आहे. दिवाळीपूर्वी वेतन न मिळाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिला आहे.
मुंबईतील शिक्षण निरीक्षकांच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागांअंतर्गत खासगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ऑगस्टमध्ये ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. त्यानंतर हे शिक्षक महापालिकेच्या शाळांमध्ये नियमितपणे अध्यापनाचे काम करीत आहेत, मात्र दोन महिने उलटूनही त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. काम सुरू असताना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे.
वेतन रखडल्याचा थेट परिणाम शिक्षकांच्या आर्थिक नियोजनावर झाला आहे. गृहकर्ज आणि विम्याचे हप्ते थकल्याने संबंधित आर्थिक संस्थांकडून विलंब शुल्क व दंड आकारला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षकांची कोंडी झाली आहे. नियमित काम करूनही वेळेवर वेतन मिळत नसल्याने शिक्षकांच्या अडचणी अधिक गंभीर बनल्या आहेत.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनिल बोरनारे यांनी ठाणे महापालिकेचे उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांना निवेदन पाठविले आहे. समायोजित शिक्षकांच्या वेतनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दिवाळीपूर्वी थकीत वेतन अदा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास शिक्षक महासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.