सेंच्युरी रेयॉनच्या रामलीलेत भक्तिरस
४४ वर्षांची परंपरा जपत कामगारांनी साकारले जिवंत प्रसंग
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : हनुमानाचे लंकादहन, प्रभू श्रीरामांच्या हस्ते रामेश्वराची स्थापना आणि विभीषणाची शरणागती... रामायणातील या प्रसंगांनी सेंच्युरी रेयॉनच्या भव्य रामलीलेत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. ‘जय श्रीराम’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कंपनीच्या कामगारांनी गेल्या ४४ वर्षांपासून जपलेल्या या सांस्कृतिक परंपरेत भक्ती, श्रद्धा आणि कलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सेंच्युरी रेयॉनमधील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सहभागातून ही रामलीला साकारण्यात येते. नुकत्याच सादर झालेल्या लंकादहनाच्या थरारक प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यानंतर रामेश्वराची स्थापना आणि विभीषणाच्या शरणागतीचे भावनिक प्रसंगही प्रभावीपणे सादर करण्यात आले. कलाकारांचा अभिनय, दमदार संवाद आणि आकर्षक रंगमंच सजावटीमुळे रामायणातील प्रसंग जिवंत झाले.
या रामलीलेचे वैशिष्ट्य म्हणजे रामायणातील सर्व पात्रे कंपनीचे कामगार आणि त्यांची मुले साकारतात. करण दुबे श्रीराम, मोहित दुबे लक्ष्मण, रोहित मंडल सीता, तर सूरज उपाध्याय रावणाची भूमिका साकारत आहेत. एस. आर. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ कलाकार रामायणातील प्रसंग सादर करीत आहेत. राजकुमार दुबे गेल्या ४४ वर्षांपासून रामलीलेचे संचालन करीत आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष श्रीकांत गोरे, जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले.
दसरा मेळ्याचे आकर्षण
उल्हासनगरसह कल्याण, अंबरनाथ आणि परिसरातील भाविकांनी रामलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. मैदानावरील दसरा मेळ्यात घरगुती वस्तू, खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच कामगार एकता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही रामलीला उल्हासनगरच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.