दसऱ्याला फुलांची आवक वाढल्याने भावात घसरण
झेंडू घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये किलो; शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांना मोठी मागणी असली, तरीही बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भावात घसरण झाली आहे. विशेषतः झेंडूच्या फुलांचे भाव घसरल्यामुळे उत्तम उत्पन्नाची अपेक्षा धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. सध्या घाऊक बाजारात झेंडूला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये भाव मिळत असून, किरकोळ बाजारात तोच झेंडू ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे.
नवी मुंबईतील फुलांच्या बाजारात नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि जुन्नर या भागांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. दसरा आणि नवरात्रोत्सवाच्या काळात फुलांना चांगली मागणी असल्याने झेंडूला किलोमागे ६० ते ८० रुपये भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र बाजारात फुलांचा पुरवठा वाढल्याने झेंडूचे भाव अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहेत. त्यामुळे उत्पादन, मजुरी आणि वाहतूक खर्चाचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दसऱ्याच्या काळात फुलांना चांगली मागणी असते, मात्र यंदा पाऊस नसल्यामुळे विविध भागांतून बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मालाची आवक वाढल्याने झेंडूचे भाव घसरले असून, शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत आहे, असे फुलांचे व्यापारी राहुल खांडगे यांनी सांगितले.
शेवंती अन् गुलाबाचे भाव तेजीत
झेंडूचे भाव घसरले असले, तरी बाजारात इतर फुलांचे भाव तुलनेने तेजीत आहेत :
पांढरी शेवंती : १६० ते २०० रुपये किलो
पिवळी शेवंती : १२० ते १५० रुपये किलो
गुलाब (बंडल) : ६० ते ८० रुपये
गुलाब (किलोचा दर) : ८० ते १०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.