जे. जे. रुग्णालयात गुंतागुंतीचे हृदयोपचार यशस्वी
स्टेंट व बलूनद्वारे उपचार; मोठी शस्त्रक्रिया टाळली
सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २० (बातमीदार) : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे आणि हृदयाच्या झडपेचा संकुचितपणा अशा दुहेरी समस्यांनी ग्रस्त असलेल्या ८० वर्षीय रुग्णावर सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीचे हृदयोपचार यशस्वीरीत्या केले. वाढते वय आणि अनेक सहव्याधींमुळे मोठी शस्त्रक्रिया करणे जोखमीचे ठरण्याची शक्यता असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी आक्रमक उपचारपद्धतीचा अवलंब करण्यात आला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत हे उपचार मोफत करण्यात आले.
रुग्णाच्या हृदयातील ‘एलएडी’ आणि ‘डी-१’ या रक्तवाहिन्यांच्या फाट्यावर गंभीर अडथळे निर्माण झाले होते. तसेच हृदयाच्या मोठ्या भागाला रक्तपुरवठा करणारी ‘एलसीएक्स’ रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. याशिवाय, हृदयाची ‘मिट्रल’ झडपही मोठ्या प्रमाणात अरुंद झाली होती. एकाच वेळी रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि झडपेचा संकुचितपणा अशा दोन गंभीर समस्यांवर उपचार करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते.
रुग्णाचे वय, सहव्याधी आणि हृदयाच्या स्थितीचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर हृदयरोग, हृदयशल्यचिकित्सा आणि भूलशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे उपचारांची आखणी केली. रक्तवाहिन्यांच्या फाट्यावर दोन स्टेंट बसविण्याऐवजी मुख्य रक्तवाहिनीत औषधयुक्त स्टेंट आणि उपशाखेत औषधयुक्त बलून वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पद्धतीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये धातूचे प्रमाण कमी ठेवून उपचार करण्यास मदत झाली.
रक्तवाहिन्यांची अंतर्गत रचना स्पष्टपणे तपासण्यासाठी ‘आयव्हीयूएस’ या आधुनिक प्रतिमांकन तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर बलूनच्या सहाय्याने अरुंद झालेली मिट्रल झडप रुंद करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
हृदयरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि युनिटप्रमुख डॉ. अनंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही उपचारपद्धती राबविण्यात आली. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग विभागासह हृदयशल्यचिकित्सा आणि भूलशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी उपचारांत सहभाग घेतला. रुग्णाचे वय आणि सहव्याधी लक्षात घेऊन उपचारांची योग्य पद्धत निवडण्यात आल्याने मोठी शस्त्रक्रिया टाळून दोन्ही समस्यांवर कमी आक्रमक पद्धतीने उपचार करणे शक्य झाले.
आधुनिक तंत्रज्ञानातून उपचारांची सुविधा
वाढते वय आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंतीचे हृदयोपचार करताना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि विविध विभागांतील तज्ज्ञांचा समन्वय महत्त्वाचा ठरतो. या उपचारांतून शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रगत हृदयोपचार सुविधांचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना अशा महागड्या उपचारांची सुविधा मोफत उपलब्ध होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.