वसई-विरारमध्ये युवकांचा भक्तिमार्ग
नवरात्रोत्सवात आध्यात्मिकतेला पसंती
वसई, ता. १९ (बातमीदार) : नवरात्रोत्सव म्हटला की गरबा, दांडिया आणि उत्साहाचे वातावरण डोळ्यांसमोर येते. मात्र, वसई-विरार शहरात यंदाच्या नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांमध्येही युवकांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. नऊ दिवसांच्या उत्सवात देवीची आराधना, मंत्रोच्चार, होमहवन आणि सामूहिक पूजाविधींमध्ये तरुणाई रमल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
वसई पश्चिम येथे स्वस्तिक सेवा संस्थेच्या वतीने धार्मिक विधींसह प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य यज्ञाचार्य राधाकृष्ण महाराज आणि अन्य पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमांतून मंत्रोच्चार, भक्तीभाव आणि माता भवानीच्या उपासनेचे महत्त्व विशद करण्यात आले. प्रवचनांच्या माध्यमातून देवीस्तुती, धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक साधनेचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमात युवकांचा उत्साह विशेष जाणवला.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पूजा-अर्चा, हवनात्मक महायज्ञ, १०८ प्रदक्षिणा, कन्यापूजन, विशेष आरती आणि महाभंडारा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासोबतच देवीच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.
वसई-विरारमधील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांनी देवीच्या दर्शनासाठी तसेच आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थिती लावली. शहरातील प्रमुख देवी मंदिरांमध्येही दर्शनासाठी युवकांची गर्दी दिसून आली. गरबा आणि दांडियाच्या जल्लोषात सहभागी होत असतानाच धार्मिक परंपरांशी नाते जोडण्याकडेही तरुणांचा कल असल्याचे या उत्सवातून दिसून आले.
आजच्या डिजिटल युगात युवकांचा मोठा वेळ मोबाईल आणि इंटरनेटवर खर्च होत असल्याची चर्चा असते. मात्र, नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, परंपरा, भक्ती आणि आध्यात्मिकतेविषयीची ओढही तरुणाईमध्ये कायम असल्याचे चित्र वसई-विरारमध्ये अनुभवायला मिळाले. उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक आनंदासोबतच भक्तिभाव आणि सामूहिक सहभागाची परंपराही अधोरेखित झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.