बदलापूर, ता. २० (बातमीदार) : पश्चिमेतील रमेशवाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून गणेश यादव (वय ३०) याची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गणेशचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अवनीश सिंग आणि संदीप सिंग या २४ ते २५ वयोगटातील दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यादव आणि संबंधित आरोपींमध्ये २०२२-२३ या काळात वाद झाले होते. त्यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित तरुण जामिनावर बाहेर होते. जुन्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित तरुण रमेशवाडी आणि बॅरेज रोड परिसरातील रहिवासी असून, ते एकमेकांच्या परिचयाचे असल्याचे समोर आले आहे. बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची आणि अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. गुन्हेगारीची कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.