पेणमध्ये पाणीटंचाईचे सावट
प्रशासनाकडून १३७ वनराई बंधाऱ्यांची उभारणी
पेण, ता. २० (वार्ताहर) : यंदा पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने पेण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात नोव्हेंबरपर्यंत १३७ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमातून शेती, भाजीपाला लागवड तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत नैसर्गिक प्रवाहातील पाणी अडवून त्याचा उपयोग उन्हाळ्यात करण्यासाठी वनराई बंधारे उभारले जात आहेत. पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी संबंधित ग्रामपंचायतींना बंधारे बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरोशी, दूरशेत, जिते, वरसई, महलमिरा डोंगर, तरणखोप, रोडे, पाबळ, जिरवणे, करोटी, डोलवी, वडखळ, निगडे, खारपाले, वरप शेडाशी, बोरगाव, वरवणे, वाशिवली, निधवली, जावळी, बेलवडे, आंबेघर, करंबेली आराव, कांदळे, मलेघर, सापोली, वाक्रुळ आणि कामार्ली या ग्रामपंचायतींचा या उपक्रमात समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या लोकसहभागातून बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या रब्बी हंगामातील पेरणी आणि भाजीपाला लागवडीची कामे सुरू असल्याने पाण्याची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. पावसाचे पाणी साठविल्यास स्थानिक शेतीला त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र, पावसाची कमतरता लक्षात घेता आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
खारेपाटात पाणीपुरवठ्याची चिंता
पेण तालुक्यातील खारेपाट विभागात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या जाणवते. हेटवणे धरण जवळ असूनही या भागातील नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किरण म्हात्रे यांनी सांगितले. खारेपाट विभागाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, तसेच हेटवणे धरणाप्रमाणे आंबेगाव धरणातील पाणीही या भागासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासनाचे निर्देश
यंदा अनेक ठिकाणी कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जलसंधारणाच्या दृष्टीने प्रत्येक ग्रामपंचायतीला वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तालुक्यातील १३७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.