मुंबईत २३८ वातानुकूलित लोकल धावणार!
२०२७ च्या अखेरीस पुरवठा सुरू होणार; पाच स्थानकांवर उन्नत पुलांच्या कामांना वेग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी २३८ वातानुकूलित लोकलची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) यांच्यात ७ सप्टेंबरला सामंजस्य करार झाला. या लोकलचा पुरवठा २०२७ च्या अखेरीस सुरू होऊन २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, विरार, नालासोपारा, घाटकोपर, दादर आणि वसई रोड स्थानकांवर उन्नत पुलांच्या उभारणीसाठी सप्टेंबरमध्ये गर्डर बसविण्यात आले.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (एमयूटीपी) टप्पा-तीन आणि तीन-अ अंतर्गत २३८ वातानुकूलित लोकल मंजूर करण्यात आल्या आहेत. या लोकलमध्ये एकूण २,८५६ डबे असतील. नव्या लोकलमुळे उपनगरी रेल्वेच्या आधुनिकीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
उपनगरी रेल्वे स्थानकांवरील उन्नत पुलांच्या कामांनी सप्टेंबरमध्ये महत्त्वाचे टप्पे गाठले. विरार स्थानकात फलाट क्रमांक ३अ आणि ४अ येथे २५ मीटर रुंदीच्या आणि ३६० मीटर लांबीच्या उन्नत संरचनेसाठी १२ आणि २१ सप्टेंबरला गर्डर बसविण्यात आले. नालासोपारा स्थानकात २९ मीटर रुंदीच्या आणि १७६ मीटर लांबीच्या संरचनेसाठी १८ गर्डर बसविण्यात आले.
घाटकोपर स्थानकात पश्चिमेकडील आठ मीटर रुंदीच्या आणि २३० मीटर लांबीच्या उन्नत संरचनेसाठी सात गर्डर बसविण्यात आले. दादर स्थानकात ३२ मीटर रुंदीच्या आणि २०० मीटर लांबीच्या संरचनेसाठी आठ गर्डर बसविण्यात आले. वसई रोड स्थानकात फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील उन्नत संरचनेसाठी ३० सप्टेंबरला क्रॉस गर्डर बसविण्यात आला.
ही कामे करताना आवश्यकतेनुसार रेल्वे वाहतूक आणि विद्युतपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. नियमित रेल्वे वाहतुकीवरील परिणाम कमीत कमी ठेवून ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
विरार-डहाणू मार्गावर रूळ टाकण्याचे काम
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत सफाळे-वाणगाव विभागात रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रेल्वे रुळांचे चार रेक उतरविण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात या मार्गावरील रेल्वे वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
मिरा रोड स्थानकात सौरऊर्जा प्रकल्प
एमयूटीपी-तीन-अ अंतर्गत स्थानक सुधारणा प्रकल्पात मिरा रोड स्थानकातील सौरऊर्जा प्रकल्प सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आला. हा प्रकल्प मुंबई सेंट्रल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. रेल्वेच्या कामकाजात अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.