‘शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी
शिवसेनेचे बळ वाढवणार’
प्रताप सरनाईक यांचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, ही शिवसैनिकांची भावना असून, त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी उत्सवी गर्दीपेक्षा शेतकऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, स्वतःच्या खर्चातून तसेच शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. सक्षम शिवसैनिकांनीही वैयक्तिक खर्चातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांनी केवळ आरोप करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करावी, असे आव्हान त्यांनी दिले. ‘एकच शिवसेना, बाळासाहेबांची’ या संजय राऊत यांच्या विधानाशी सहमत असल्याचे सांगत मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन एकनाथ शिंदे शिवसेना पुढे नेत असल्याचा दावा सरनाईक यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेल्या विरोधकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे नमूद करीत महापौरांचा चालक असो किंवा अन्य कोणी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही सरनाईक यांनी केली.
………….
आव्हाडांना सुरक्षा देण्याची मागणी
जितेंद्र आव्हाड यांना खरोखर धमकी मिळाली असेल तर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली. ठाणे आणि महाराष्ट्राला आव्हाड यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.