झापमध्ये शेतीचे नुकसान
ग्रामपंचायतीच्या वतीने पंचनामे सुरू
जव्हार, ता. २१ (बातमीदार) : झाप ग्रामपंचायत हद्दीत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या वतीने नुकेतच नुकसानीची पाहणी करून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा निर्माण झाली आहे.
झापचे सरपंच एकनाथ दरोडा आणि ग्रामविकास अधिकारी अमोल भोये यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. या वेळी नुकसानीची माहिती घेऊन पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे. आगामी हंगामाचे नियोजन आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. तसेच राज्य शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास सरपंच एकनाथ दरोडा यांनी शेतकऱ्यांना दिला.
मदतीची प्रतीक्षा
“शेतीच्या नुकसानीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांवर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले असून, शासनाने पंचनाम्यांच्या आधारे लवकर आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सखाराम वारा यांनी केली. तसेच शेती हा आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. पिकांचे नुकसान झाल्याने वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, याची चिंता आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाची मदत लवकर मिळवून द्यावी,” अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी भिवा वाघ यांनी व्यक्त केली.