एसटीसाठी तहसीलदारांना साकडे
मुरबाड-बदलापूर मार्गावरील सेवा महिनाभरापासून बंद; प्रवाशांची गैरसोय
मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : मुरबाड-बारवी धरणमार्गे बदलापूर या मार्गावरील एसटी बससेवा गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. बेलपाडा गावाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बस वाहतूक थांबवली आहे, मात्र रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बससेवा तातडीने सुरू करण्यासाठी मुरबाडच्या तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुरबाड ते बेलपाडा यादरम्यान रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. बेलपाडा गावाजवळील कामाच्या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने एसटी बस चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद केली, मात्र याचा फटका बारवी धरण परिसरातील गावांमधील नागरिकांना बसत आहे. बेलपाडा ते बारवी धरणादरम्यान असलेल्या गावांतील नागरिकांची सार्वजनिक वाहतुकीची सुविधा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. कामानिमित्त, शिक्षणासाठी, बाजारपेठेत जाण्यासाठी तसेच अन्य आवश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
भाड्याचा अतिरिक्त भार
मुरबाडहून बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता म्हसा-बोराडपाडा मार्गे सुमारे १५ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. यासाठी प्रवाशांना सुमारे ३० रुपये जादा भाडे मोजावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला यामुळे कात्री लागत आहे. दुसरीकडे, खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रवासाचा खर्च वाढला आहे. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.
यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावर काम सुरू करताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक असते, मात्र संबंधित ठेकेदार आणि रस्त्याचे काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेकडून याबाबत योग्य नियोजन झाले नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध करून न देता एसटी सेवा बंद राहिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, अन्य वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी मुरबाडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे प्रतिनिधी, संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवावी. रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करून पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी आणि बंद असलेली बससेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी किरण खरे आणि जयदीप अडाईंगे यांनी प्रवाशांच्या वतीने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.