प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मूक आंदोलन
विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्रातील एमबीबीएस प्रशिक्षणार्थी (इंटर्न) डॉक्टरांच्या मासिक विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (एएसएमआय) यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. २२) राज्यभर शांततापूर्ण मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉक्टरांना सध्या मिळणारे १८ हजार रुपयांचे मासिक विद्यावेतन वाढवून ३० हजार रुपये करावे, तसेच दरवर्षी तीन टक्के वाढ लागू करावी, अशी प्रमुख मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही अद्याप निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अन्न, निवास, प्रवास आणि इतर आवश्यक खर्चांसाठी वाढत्या महागाईच्या तुलनेत मिळणारे विद्यावेतन अपुरे पडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर पार पाडत असलेल्या व्यापक दैनंदिन जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण लक्षात घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. विद्यावेतनवाढीबाबत शासनाने लेखी आश्वासन देऊन निर्णयासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शासनाने १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत समाधानकारक प्रतिसाद न दिल्यास २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, मात्र या संपादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यावेतनात वाढ, दरवर्षी तीन टक्के वाढ आणि शासनाकडून वेळेत निर्णय घ्यावा, अशी मागणी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केली.
लवकरात लवकर तोडगा काढा!
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दरमहा २५ हजार रुपये, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३० हजार रुपये विद्यावेतन मिळत असल्याचा दाखला देत महाराष्ट्रातील विद्यावेतन वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नावर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करून लवकरात लवकर तोडगा काढावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.