अतिक्रमणावर महापालिकेचा वॉच
नेहरू चौकासह प्रमुख बाजारपेठांसाठी दोन विशेष पथके तैनात
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, त्यात अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी या समस्यांना आळा घालण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने दोन विशेष पथके तैनात केली आहेत. व्यापारी संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, नेहरू चौकासह प्रमुख बाजारपेठांतील अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या पथकांवर असेल. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारपेठांमधील रस्ते मोकळे ठेवण्याबरोबरच ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे आव्हान महापालिकेसमोर असेल.
दसरा ते दिवाळी या काळात प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. अशा वेळी रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या अनधिकृत हातगाड्या, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे व्यापारी, ग्राहक तसेच वाहनचालकांची गैरसोय होते. गर्दीच्या काळात पादचाऱ्यांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांना पत्र देऊन विशेष कारवाईची मागणी केली होती.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठांतील अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करावीत, अशी मागणी संघटनेने केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी दोन विशेष पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठांतील गर्दीचे नियोजन आणि अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या पथकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे बाजारपेठांमधील अनधिकृत अतिक्रमणाला आळा बसेल आणि ग्राहकांना खरेदीसाठी मोकळे व सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा दीपक छतलानी यांनी व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
व्यापारी संघटनेच्या मागणीला यश
दिवाळीच्या खरेदीच्या काळात नेहरू चौकासह प्रमुख बाजारपेठांमध्ये अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची बाब उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. संघटनेचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी दोन स्वतंत्र पथकांची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी दोन विशेष पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.