सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शहरात पाणीकपात सुरू झाली असून काही भागांत आठवड्यातून ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना तरण तलाव आणि वाहनधुलाई केंद्रांना होणारा पाणीपुरवठाही थांबवावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार १६ ऑक्टोबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. शहराला दररोज मिळणाऱ्या ५९० दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आधीच तूट जाणवत आहे. त्यातच २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून २४ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ३६ तास बंद राहणार आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
या परिस्थितीत पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठी व्हावा, यासाठी व्यावसायिक वापरावरही निर्बंध घालण्याची गरज असल्याचे वाघुले यांनी म्हटले आहे. शहरातील महापालिकेचे तसेच खासगी संकुल आणि क्लबमधील जलतरण तलावांना पाणी लागते. याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते. या दोन्ही प्रकारच्या वापरावर तात्पुरते निर्बंध घातल्यास पाण्याची बचत होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
उन्हाळ्यातही घातले होते निर्बंध
ठाणे शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर एप्रिलमध्ये महापालिकेने सर्व्हिस सेंटरमध्ये वाहने धुणे आणि पाण्याने साफसफाई करण्यावर १० जूनपर्यंत निर्बंध घातले होते. त्यापूर्वी मे २०२४ मध्येही अशाच प्रकारची बंदी लागू करण्यात आली होती. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला होता. आता पाणीकपातीचे संकट पुन्हा गडद होत असताना वाहनधुलाईवरील निर्बंध पुन्हा लागू करण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र, तरण तलाव आणि सर्व्हिस सेंटरचा पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.