भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका क्षेत्रात सरकारची मान्यता नसलेल्या २७ शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून पाच महिन्यांत केवळ पाच शाळाचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित शाळांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. तसेच पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहनही केले जाते. असे असतानाही अनधिकृत शाळांवरील कारवाई संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने शांतिनगर पोलिस ठाण्यात जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबीनगर), कैसर बेगम इंग्रजी शाळा (नागाव), व्हिक्टोरिया इंग्रजी प्राथमिक शाळा (सुभाषनगर), इस्लामिया इंग्रजी शाळा (फातमानगर) आणि मोहम्मद मुरसलीम पब्लिक स्कूल (कल्याण रोड) या पाच शाळाचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या २७ शाळांपैकी चार शाळांना सरकारची मान्यता मिळाली आहे. चार शाळा संबंधित ठिकाणी बंद आहेत, तर तीन शाळा पोलिस प्रशासनाने बंद केल्या आहेत. उर्वरित ११ शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या आकडेवारीनुसार पाच शाळांबाबतची सद्यःस्थिती स्पष्ट होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) कामात कर्मचारी व्यस्त असल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अन्य अनधिकृत शाळांवरील कारवाईला विलंब होत आहे. लवकरच उर्वरित शाळांवरही कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सौदागर शिखरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.