पूर्णेकर हत्या प्रकरणात
दोन चॉपर, पिस्तूल हस्तगत
संतोष आणि अमितसिंग यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) आणखी एक पिस्तूल आणि दोन चॉपर हस्तगत केले. कर्नाळा येथील काले गाव परिसरात आरोपी संतोषने लपवलेली शस्त्रे बुधवारी (ता. २१) रात्री जप्त करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी संतोष आणि अमितसिंग यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संतोष आणि अमितसिंग ९ ऑक्टोबरपासून पोलिस कोठडीत आहेत. या दोघांच्या कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी (ता. २२) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान, आतापर्यंत दोन पिस्तुल आणि दोन चॉपर हस्तगत केले असून अद्यापही आरोपींचे कपडे, आणखी एक चॉपर, मोबाईल आणि हेल्मेट हस्तगत करायचे असल्याचे पोलिस अधिकारी शैलेश साळवी यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. तसेच पूर्णेकर कुटुंबीयांनी दिलेल्या दोन व्हिडिओंच्या आधारे तपास करायचा असल्याने तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली, मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी मंजूर केली.
दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांचे वकील समीर हाटले यांनी या वेळी, प्रयागराज पोलिसांनी आरोपींना अटक करताना न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालाचा संदर्भ दिला. ही हत्या वैयक्तिक कारणातून नव्हे, तर आरोपींना सुपारी देऊन घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कुटुंबीयांनी दिलेल्या दोन व्हिडिओंमध्ये पाच आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांच्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून, पुण्यातील मुळशी येथे शस्त्रप्रशिक्षण दिल्याचा दावाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी अटकेतील आरोपी पोलिस कोठडीत असून, सादर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दिसत नसल्याचा युक्तिवाद केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.