डोंबिवलीत फिजिओथेरपीच्या
विद्यार्थिनीची आत्महत्या
मानसिक त्रास दिल्याचा आरोप; एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : गोलवली येथील एका लॉजमध्ये २३ वर्षीय फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी सुमीत खवळे (वय ३०) याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, प्रेमसंबंधातून मानसिक त्रास, खासगी फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सुमीत याला पोलिसांनी अटक केली आहे.
मानपाडा पोलिस ठाण्यात वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मुलगी अंबरनाथ येथील एका कॉलेजमध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेत होती. ८ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ती घरातून कॉलेजला गेली; मात्र रात्री घरी परतली नाही. तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबीयांनी ९ ऑक्टोबरला कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, गोलवली येथील एका लॉजमध्ये ८ ऑक्टोबरला ती थांबल्याची माहिती समोर आली. ९ ऑक्टोबरला खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज कर्मचारी आणि पोलिसांनी दरवाजा उघडला त्या वेळी ती मृतावस्थेत आढळली. तिने तेथे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीदेखील पोलिसांना आढळून आली आहे.
मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, सुमीत आणि मुलीचे प्रेमसंबंध होते, मात्र तिने त्याच्याशी बोलणे बंद केल्यानंतर तो इन्स्टाग्रामसह अन्य माध्यमांतून संपर्क साधत होता. तसेच, तिचे काही फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास देत असल्याचे मुलीने तिच्या बहिणीला सांगितल्याचा दावा वडिलांनी केला.
पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत सुमीत खवळे याच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या यांचाही उल्लेख असल्याचे वडिलांनी म्हटले आहे. त्यामुळे सुमीतविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासह प्राचार्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमीतला अटक केली असून, त्याला गुरुवारी (ता. २२) कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.