दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २३ : पूर्ववैमनस्य, किरकोळ वाद आणि बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून उल्हासनगर शहरात आठ महिन्यांत १० हत्यांच्या घटना घडल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून थेट जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनांमध्ये गोळीबाराच्या दोन प्रकरणांचा समावेश असून, त्यात दोन सख्ख्या भावांचा बळी गेला. माहिती अधिकार कार्यकर्ते हरेश गजवानी ऊर्फ शहानी यांच्या हत्येनेही शहरात खळबळ उडाली. दरम्यान, या सर्व प्रकरणांचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कचऱ्याच्या वादातून महापालिकेचा कचरा संकलनाचा ठेका हाताळणाऱ्या कोणार्क कंपनीतील कामगार महादू जगताप यांची हत्या ९ मार्चला करण्यात आली. त्यानंतर २३ मार्चला शेजाऱ्याशी झालेल्या वादातून प्रवीण वर्मा यांना दगडाने मारहाण करून ठार करण्यात आले. या घटनांमधून किरकोळ वादांचे पर्यवसान थेट हत्येत होत असल्याचे स्पष्ट झाले. २१ मे रोजी जुन्या वादातून कैलास कॉलनी चौकात रात्री गोळीबार करण्यात आला. या घटनेत अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा गोळीबारात बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सप्टेंबरमध्ये मद्याच्या दुकानात धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून नितेश लोधे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्याच महिन्यात जुन्या वैमनस्यातून सुभाष टेकडी परिसरात रोहित जगदाळे यांची हत्या करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते हरेश गजवानी ऊर्फ शहानी यांची उल्हासनगर रेल्वेस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ गोळीबार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तपासाचा भाग म्हणून आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले.
शहरात एकापाठोपाठ घडलेल्या हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्व प्रकरणांचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष आव्हाड, अशोक कोळी, चंद्रहार गोडसे आणि संदीप शिवले यांना यश आले. काही प्रकरणांत पूर्ववैमनस्य, तर काही घटनांत क्षुल्लक कारणे हत्येमागे असल्याचे समोर आले आहे. आठ महिन्यांतील १० हत्यांनी शहराला हादरवले असताना, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जुन्या वादातून हत्या
जुन्या वादातून ६ जुलैला सतनामसिंग लबाना यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. याच महिन्यात प्रेमसंबंधांच्या कारणातून एका आईने आपल्या १९ वर्षीय मुलीचा, अमृता गरड हिचा, गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या घटनेने कौटुंबिक नात्यांमधील संघर्षाचे भीषण रूप समोर आले. ऑगस्टमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून रोशन सुरडकर यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोशन यांचा नंतर मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.