अव्वल शाळांचे अनुकरण करा!
गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापकांना शाळा भेटीचे निर्देश
मुंबइ, ता. २३ : राज्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यात (एसक्यूएएएफ) सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांना इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनी भेटी देण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी दिले आहेत. या भेटींच्या माध्यमातून चांगल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेऊन शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये राज्यातील एक लाख दोन हजार ६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. त्यापैकी सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांमधून २०२५-२६ मध्ये १० हजार ७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती. यापैकी १० हजार ६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले आहे. २०२५-२६ मधील स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया १५ मार्च ते १८ मे २०२६ या कालावधीत पार पडली. जिल्ह्यातील तालुकानिहाय सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांची माहिती maa.ao.in या संकेतस्थळावरील ‘एसक्यूएएएफ’ डॅशबोर्डवरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळांना जवळच्या केंद्रातील इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनी भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी दिले आहेत. शाळा भेटीपूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडलेल्या शाळेला किमान तीन दिवस आधी सूचना द्यावी लागेल. वर्षातून एक दिवस नियोजित भेट देता येईल. भेटीसाठी मुख्याध्यापक आणि एसक्यूएएएफचे काम पाहणाऱ्या एका शिक्षकाने सहभागी व्हावे, द्विशिक्षकी शाळेतून केवळ मुख्याध्यापकांनी भेटीचे नियोजन करावे, भेटीदरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच भेट देणाऱ्या शाळेचे कामकाज बंद पडणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश आहेत.
शाळा विकास आराखड्यावर भर
भेटीदरम्यान एसक्यूएएएफमधील विविध क्षेत्रे, मानके, शाळेची उल्लेखनीय कामगिरी, सुधारणेची गरज असलेली क्षेत्रे, उपलब्ध पुरावे आणि शाळेचे नियोजन यावर सकारात्मक चर्चा करावी. भेटीनंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत अनुभवांची चर्चा करून त्याची नोंद इतिवृत्तात करावी. त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने शाळा विकास आराखडा तयार करून त्याला मान्यता घ्यावी. या उपक्रमातून चांगली कामगिरी करणाऱ्या शाळा इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.