सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण-डोंबिवली परिसरात शनिवारी (ता. २४) अचानक दृश्यमानता कमी झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर परिसरात धुरकट चादर पसरल्याचे चित्र दिसून आले. सुमारे ५०० मीटर अंतरापलीकडील वस्तू स्पष्ट दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. हा प्रकार वायुप्रदूषणामुळे घडला की वातावरणातील बदलांमुळे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो. रासायनिक कारखान्यांमुळे होणारे जल आणि वायुप्रदूषण, तसेच नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अचानक दृश्यमानता कमी झाल्याने प्रदूषणाच्या प्रश्नावरून नागरिकांनी चिंता व्यक्त केली. मात्र, दृश्यमानता कमी होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केवळ कल्याण-डोंबिवलीतच नव्हे, तर ठाणे, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातही दृश्यमानता कमी झाल्याचे दिसून आले. परिसरात सुरू असलेल्या मोठ्या गृह आणि विकास प्रकल्पांमुळे धुळीचे कण हवेत पसरत असल्याने दृश्यमानतेवर परिणाम झाला असण्याची प्राथमिक शक्यता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, दृश्यमानता कमी झालेल्या कालावधीत हवेच्या गुणवत्तेची नेमकी स्थिती काय होती, याबाबतचा तपशील उपलब्ध झालेला नाही. हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढले असल्यास त्यासाठी जबाबदार घटकांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दृश्यमानता कमी होण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी तपासून संबंधित यंत्रणांनी तातडीने स्पष्टता द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दिल्लीतील प्रदूषणाची आठवण
डोंबिवलीतील वातावरण पाहून दिल्लीतील प्रदूषणाची आठवण होत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास दहाव्या मजल्यावरूनही ५०० मीटरपलीकडील परिसर स्पष्ट दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले. अंबरनाथमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
कारवाईची मागणी
प्रदूषण नियंत्रण मंडळाने रासायनिक कंपन्यांसह प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई करावी. केवळ नोटिसा बजावून नाममात्र कारवाई करू नये. तसेच महापालिकेने अनधिकृत बांधकामे आणि विकासकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी कदम यांनी केली. शहरातील डॉक्टरांकडे खोकला आणि सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, या तक्रारींचा आणि धुरकट वातावरणाचा थेट संबंध अद्याप स्पष्ट झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.