रसायनांनी पिकवलेली केळी थेट ग्राहकांच्या ताटात
एपीएमसीत एफडीएची कारवाई; १.३८ टन केळी जप्त, चौघांविरोधात गुन्हा; एकाला अटक
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : एपीएमसी फळ बाजारात केळी कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एपीएमसी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी रवींद्रकुमार गौतम याला अटक केली आहे. या कारवाईत फळ मार्केटमधील गाळा क्रमांक एन-१९१ मधून रसायनांचा वापर करून पिकवलेला एक हजार ३८४ किलो केळीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
एपीएमसी फळ बाजारातील काही विक्रेते केळी रसायनांमध्ये बुडवून कृत्रिमरीत्या पिकवत असल्याचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने चित्रित केला होता. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी दीप्ती हरदास यांच्या पथकाने सोमवारी (ता. ५) एपीएमसीतील संबंधित गाळ्यावर छापा टाकला. यादरम्यान रवींद्रकुमार गौतम हा बेकायदा व बनावट रसायनांचा वापर करून केळी कृत्रिमरीत्या पिकवत असल्याचे समोर आले. ही केळी मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आल्यानंतर एफडीएच्या पथकाने सुंदरी प्रकारची १८८ किलो केळी (रुपये ५,९४०), इलायची प्रकारची ४९८ किलो केळी (रुपये ४२,३३०) आणि खट्टा-मिठा प्रकारची ६९८ किलो केळी (रुपये१९, ५४४) असा एकूण १,३८४ किलो रसायनयुक्त केळींचा साठा जप्त केला आहे.
गुन्हा दाखल झालेले आरोपी
या प्रकरणात मोहम्मद उमर मोहम्मद इखलास आणि मोहम्मद नाजिर हुसेन यांनी गाळा उपलब्ध करून देत आरोपीला मदत केल्याचे आढळून आले आहे. तसेच बंगळूर येथील साई केमिकल्स इंडस्ट्रीज या उत्पादक व पुरवठादाराने प्रतिबंधित रसायनाचे उत्पादन व विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार एफडीए पथकाने एपीएमसी पोलिस ठाण्यात रवींद्रकुमार गौतम, मोहम्मद उमर मोहम्मद इखलास, मोहम्मद नाजिर हुसेन आणि साई केमिकल्स इंडस्ट्रीज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.